
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणला पर्यटनासाठी येणाऱ्या तामिळनाडूच्या पर्यटकांची कार सोमवारी अपघातग्रस्त बनली. आय ट्वेन्टी (टीएन ११ एसी ४५०९) या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुडाळ-मालवण मार्गावर चौके-आंबेरी तिठा येथे सोमवारी दुपारी अपघात घडला. रस्त्यालगतच्या उतारावर गाडी कलंडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तामिळनाडू येथील काही तरुण पर्यटकांचा ग्रुप आय ट्वेन्टी व तवेरा अशा दोन गाड्यांमधून कुडाळ चौके मार्गे मालवणच्या दिशेने जात होता. आय ट्वेन्टी गाडीमध्ये पाच- सहा तरुण प्रवास करत होते. भरधाव असणाऱ्या या पर्यटकांची गाडी चौके आंबेरी तिठा नजीक नारायणवाडी येथील रस्त्यावर आली असता आय ट्वेन्टी गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून गटारात पडून अपघातग्रस्त झाली.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाडीतील तरुणांना बाहेर काढण्यात आले. एका तरुणाला किरकोळ दुखापत झाली. त्याला दुसऱ्या तवेरा गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी स्थानिकांच्या प्रयत्नातून जेसीबी उपलब्ध करून गटारात पलटी झालेली गाडी सरळ करण्यात आली. मात्र गाडी वर काढण्यात अडचणी येत होत्या. याच वेळी या रस्त्यावरून मालवणहुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या क्रेनला पाचारण करून क्रेनच्या साहाय्याने गाडी रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.



























































