
मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील ओरछा भागामध्ये अंगावर काटा उभा करणारा प्रकार घडला आहे. इथल्या सतार पुलावरून जात असताना कारने भरधाव येणाऱ्या रिक्षाला चुकवण्याच्या नादात तिला ठोकले. यानंतर या कारने पुलावरील एका खांबाला ठोकले आणि ही गाडी नदीत पडली. या गाडीमध्ये 6 महिन्यांच्या मुलासह पाच जण प्रवास करत होते.
ही गाडी जो माणूस चालवत होता त्याने गाडी पाण्यात पडल्यानंतर पहिले बाळाची शोधाशोध केली. त्याने बाळ दिसताच त्याला कवेत घेतले आणि पुलावर उभ्या असलेल्या माणसांच्या दिशेने फेकले. मात्र ते बाळ दुर्दैवाने पाण्यातच पडले, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तो व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
या बाळाला फेकल्यानंतर ते पाण्यातच पडले हे पाहून पुलावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ताबडतोब पाण्यात उडी मारली आणि त्या बाळाला पकडले, तेवढ्यात त्या बाळाला फेकणाऱ्या व्यक्तीनेही त्या बाळाच्या दिशेने पाण्यात झेपावत पकडण्याचा प्रयत्न केला. हे बाळ सुखरूप असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील उरई भागातील हे कुटुंब असल्याची माहिती मिळाली असून ते मंदिरात दर्शनासाठी गेलं होतं. दर्शन करून परत येत असताना ही दुर्घटना घडली. या बाळाचं नाव आरव असून तो दुर्घटना घडली तेव्हा त्याच्या आईच्या म्हणजेच अनामिका यांच्या कुशीत शांतपणे झोपला होता.
सीसीटीव्हीच्या दृश्यांवरून हे स्पष्टपणे दिसतंय की गाडी आणि रिक्षा हे वेगात येत होते. पूल अरुंद असल्याने कारने रिक्षाला चुकवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये त्या कारची रिक्षाला धडक बसली आणि नंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार पुलावर असलेल्या खांबाला धडकली. खांबाला धडकल्यानंतर ही गाडी नदीमध्ये पडली. हे दृश्य ज्यांनी पाहिलं त्यांच्या क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता. मात्र जेव्हा गाडीतल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना पाहिल्यानंतर ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रत्यक्षदर्शींना पुन्हा आठवण झाली





























































