‘गुगल मॅप’ने दाखविला चुकीचा मार्ग! पुण्यातील पर्यटकांची कार पिंपळगाव खांड धरणात बुडाली, एकाचा मृत्यू, दोनजण बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी ‘गुगल मॅप’चा वापर करणे पर्यटकांच्या जिवावर बेतल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. मॅप लावून जात असताना पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात बुडालेल्या रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील तीन पर्यटकांची कार धरणात बुडाली. यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून, पोहता येत असल्याने दोनजण बचावले आहेत.

सतीश सुरेश घुले (वय 34, रा. पिंपळे निलख, पिंपरी-चिंचवड) असे मृत पर्यटकाचे नाव असून, गुरुसत्य राजशेखर (वय 42), समीर अलुरकर (वय 44, रा. पिंपळे निलख) अशी बचावलेल्यांची नावे आहेत.

सतीश घुले, राजशेखर आणि अलुरकर हे पिंपरी-चिंचवड येथून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघाले होते. कोतूळहून राजूरकडे जाण्याऐवजी मॅपप्रमाणे ते अकोले शहराकडे निघाले. या मार्गादरम्यान मुळा नदीवरील जुना पूल लागला.

पिंपळगाव खांड धरण भरलेले असल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे. पाणी कमी असेल, असे समजून त्यांनी पाण्यात गाडी घातली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही गाडीसह पुलाच्या खाली वाहत गेले. त्यातील दोघांना पोहायला येत असल्याने ते बाहेर पडले. त्यांनी पाण्याच्या बाहेर येत आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील वस्तीवरील लोक तेथे धावले. ते सतीश यांचा शोध घेऊ लागले.

सकाळी आठ वाजेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. सकाळी पट्टीच्या पोहणाऱयांना नदीत उतरवून मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली.

दरम्यान, मृताचे नातेवाईक पिंपरी-चिंचवडहून कोतूळ येथे पोहोचले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक अजय परमार, अकोले शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलावर कोणतेही अडथळे अगर बोर्ड न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.