
गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्रीला ब्रेक लागला असून आता ऐन सणासुदीच्या काळातही या व्यवसायाला तेजी आलेली नाही. ऑगस्ट महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक 31.57 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीय ऑटोमोबाईल विनिर्माता सोसायटीने (सियाम) सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2018 मध्ये 2 लाख 87 हजार 198 तर यंदा केवळ 1 लाख 96 हजार 524 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये देशांतर्गत बाजारात कारच्या विक्रीत 41.09 टक्के घट झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 1 लाख 98 हजार 847 कारची विक्री झाली होती. आता हे प्रमाण 1 लाख 15 हजार 957 वर आहे. दुचाकी वाहनांच्या खरेदीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. विविध ऑफर्स, डिस्काऊंट जाहीर करूनही दुचाकी विक्रीचे प्रमाण 22.24 टक्क्यांनी कमी होऊन 15 लाख 14 हजार 196 वर आले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ही संख्या 19 लाख 47 हजार 304 इतकी होती. यात मोटरसायकलच्या विक्रीत 22.23 टक्क्यांनी घट झाली आहे.
कमर्शिअल वाहनांची विक्री सर्वात कमी
‘सियाम’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2019 मध्ये कमर्शिअल वाहनांची विक्री सर्वात कमी 15 हजार 573 एवढीच झाली आहे. तसेच ऑगस्ट 2018 च्या तुलनेत एलसीव्ही वाहनांची विक्री 28 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 36 हजार 324 इतकीच झाली.
मारुती सुझुकीच्या विक्रीतही 36 टक्क्यांची घट
मारुती सुझुकी कंपनीच्या ऑगस्ट महिन्याच्या विक्रीत 36 टक्क्यांची घट झाली आहे. ह्युंदै कंपनीची विक्रीही 17 टक्के कमी झाली आहे. तर टाटा मोटर्सही ऑगस्ट 2018 च्या तुलनेत यंदा निम्म्या वाहनांची विक्री करू शकले.
नो वर्क डे
वाहन खरेदीमध्ये आलेली मंदीची लाट लक्षात घेता अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी करण्यासाठी ‘नो वर्क डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. अवजड वाहनांची निर्मिती करणाऱ्या अशोक लेलॅण्डने 5 प्लॉन्टस्मध्ये काम बंद केले आहे. गेल्या आठवडय़ात मारुती सुझुकीनेही दोन प्लॉन्टस्मध्ये दोन दिवस बंद पाळला. तब्बल 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच मारुतीने हा बंद पाळला.

























































