कॅरममध्ये क्रांती, स्कोअरबोर्ड अॅपची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन गेली 9 वर्षे सातत्याने कॅरम या खेळाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक प्रचार व प्रसार व्हावा व सर्व स्तरांवर या खेळाला मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. 2013 साली प्रथम महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने स्वतःच्या संकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर कॅरमचा इतिहास व इतर माहिती सविस्तररीत्या उपलब्ध करून दिली. त्यानंतर स्वतःचे यू्ट्यूब चॅनल तयार करून संपूर्ण विश्वाला लाइव्ह कॅरमचे सामने दाखवून अगदी तळागळातील कॅरम रसिकांपर्यंत हा खेळ पोहोचविला. आज जवळपास 1500 पेक्षाही जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडूंचे सामने या यूट्यूब चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध आहेत. 3 वर्षांपूर्वी असोसिएशनने कॅरमच्या अॅपची निर्मिती करून सर्वांच्या हातात हा खेळ पोहोचविला.

1 मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने एक पाऊल पुढे टाकत कॅरम विश्वातील पहिल्या कॅरम स्कोअर बोर्डाच्या अॅपची निर्मिती करून एक अद्भुत कामगिरी केली आहे. एम.सी.ए. कॅरम स्कोअर बोर्ड असे याचे या अॅपचे नाव असून अँड्रॉइड मोबाईलधारक असलेल्या कॅरम व क्रीडारसिकांना प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करता येईल. या स्कोअर बोर्डामध्ये खेळाडूंचे नाव लिहिण्याची सुविधा असून सेट, स्कोअर व बोर्ड क्रमांक टाकण्याची सुविधा उपलब्ध आहे. स्पर्धेचे सामने असो किंवा सराव असो, सर्वांसाठी हा स्कोअर बोर्ड विनामूल्य उपलब्ध करण्यात आला आहे. शिवाय सर्वसामान्य कॅरम / क्रीडा रसिक अतिशय सहजपणे हा स्कोअर बोर्ड हाताळू शकेल याची काळजी अॅप निर्मिती करताना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने घेतली आहे. कॅरम विश्वात या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होईल अशी असोसिएशनला खात्री आहे.