
सामना प्रतिनिधी । बीड
सखाराम शिंदे यांच्या नव्या स्कॉर्पिओ गाडी जळीतप्रकरणी गाडीची वॉरंटी आणि गॅरंटी असताना एजन्सीकडून गाडी बदलून देण्यासाठी वेळकाढूपणा करण्यात येत होता. याविरुद्ध सखाराम शिंदे यांनी बीड येथील सबलोक कार्स समोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिसांनी दखल घेवून मंहिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा व एजन्सीचे मालक रोहित कमलनयन सबलोक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वनश्री पुरस्कार प्राप्त सखाराम शिंदे आणि उपमहाराष्ट्र हिंद केसरी अक्षय शिंदे यांच्या नव्या स्कॉर्पीओ गाडीने 15 जून 2017 रोजी मांजरसुंबा घाटात अचानक पेट घेतला होता. या दुर्घटनेतून शिंदे थोडक्यात बचावले होते. नव्या गाडीने पेट घेतल्यानंर गाडीचे स्पेअरपार्ट खराब होण्यास सुरुवात झाली होती, ब्रेक वेळेवर न लागणे, चाकातून आवाज येणे, पँडल जॅम होणे अशा तक्रारी वाढत होत्या. गाडी शोरूमला दाखवल्यानंतर दुरुस्ती करून गाडी परत केली जात होती. गाडीची गॅरंटी आणि वॉरंटी असतानाही सबलोक कार्स गाडीची नुकसानभरपाई देण्यास तयार नसल्यामुळे सखाराम शिंदे यांनी सबलोक कार्स एजन्सीसमोर उपोषण सुरू केले होते. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही सखाराम शिंदे यांनी सांगितले. दरम्यान उपोषणाची दखल घेवून 9 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सखाराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महेंद्रा व महेंद्रा एजन्सीचे मालक रोहित कमलनयन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































