गुजरात दंगली वेळी मोदी गप्प होते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहटी

गुजरातमध्ये 2002 सालात उसळलेल्या भयंकर जातीय दंगली वेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी ‘गप्प’ बसून राहिले होते, अशी टिप्पणी केलेल्या तीन लेखकांवर आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसाममधील बारावीच्या पाठय़क्रमिक पुस्तकातील गुजरात दंगलीवरील धडय़ात मोदींविरोधात त्या लेखकांनी टिप्पणी केली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लेखकांची नावे दुर्गा कांता शर्मा, रफीक आणि मनश प्रोतीम बारुआ अशी आहेत. त्यातील शर्मा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वे स्थानकात साबरमती एक्प्रेसचे दोन डबे पेटवण्यात आले होते. त्यात 59 कारसेवक होरपळून मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर तिथे गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी जातीय दंगल उसळली होती. त्या दंगलीत एक हजार लोकांचा बळी गेला होता. ही माहिती आसाममधील बारावीच्या एका पाठय़क्रमिक पुस्तकात पान क्रमांक 376 वरील धडय़ात देण्यात आलेली आहे.