कांदा अनुदान गैरव्यवहारप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 कोटी 88 लाख 47 हजार 524 रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करून आणि त्यासंबंधीत निधीचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह आडते व व्यापारी अशा 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे 2023 ते 1 जुलै दरम्यान या घटना घडल्या.

सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा. वेळू, ता. श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार ट्रेडिंग कंपनी आणि त्यांचे दिवाणजी महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्सचे घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढाळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रेय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा. श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबिरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी) यांचा समावेश आहे.

नगर जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्थेचे राजेंद्र फकिरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम करीत आहेत.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव दिलीप डेबरे यांच्यासह व्यापारी, आडते यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याची व्याप्ती फार मोठी आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान काढून शासनाची तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.