
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला हिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ‘एक्स’ अकाऊंटवर अपलोड केल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
अंजली यूपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याचे ध्रुव राठीच्या या पोस्टमध्ये म्हटले होते. अंजलीचा चुलत भाऊ नमन महेश्वरीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नव्या भारतीय न्याय संहिता कायद्याखाली राठीविरुद्ध अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीची बदनामी करून सामाजिक शांततेला धक्का पोहोचवल्याचा आरोप राठी याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आक्षेपार्ह विधान केल्याबद्दलही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ध्रुव राठी हा प्रसिद्ध यूटय़ूबर आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक व्हिडीओ तयार करून तो यूटय़ूब आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजप आणि पेंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडीओ टाकले होते. त्या व्हिडीओंना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.
‘आपला एकमेव असा देश आहे, जिथे तुम्ही यूपीएससीसारख्या परीक्षेला न बसताही उत्तीर्ण होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी असणे आवश्यक आहे. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने यूपीएससी परीक्षा न देताच त्यात यश मिळविले. अंजली बिर्ला ही व्यवसायाने मॉडेल आहे. मोदी सरकारने शिक्षण क्षेत्राची थट्टा उडवली आहे,’ अशी पोस्ट राठी याने एक्स अकाऊंटवर अपलोड केली होती.