
सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली. मात्र, माचीस नाही म्हटल्याने कत्तीने मारहाण केल्याची घटना लातूर शहरातील शिवाजीनगर भागात घडली. या प्रकरणी 4 जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाण प्रकरणी यशोधन केशवराव कातळे (रा.गरसोळी, ता.रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तो सध्या शिक्षणासाठी शिवाजीनगर लातूर येथे राहतो. त्याने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, तो व त्याचा मित्र हे बोलत असताना मनोज धोत्रे याने त्यास सिगारेट ओढण्यासाठी माचीसची मागतली. त्याला माचीस नाही असे सांगितले असता त्याने विनाकारण आपल्याला व मित्राला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यावर मनोज धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी लोखंडी कत्तीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































