
घराकडे पाहून शिव्या देऊ नको असे म्हटल्याने चाकूने, बेल्टने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रेणापूर तालूक्यातील भंडारवाडी येथे घडली. या प्रकरणी चारजणांविरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी ज्ञानोबा रामकिशन आलापूरे (रा. भंडारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. विष्णू शिवाजी मामडगे आणि इतर तक्रारदाराच्या घराकडे पाहून शिव्या देत जात होते. त्यामुळे शिव्या का देता, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर विष्णू शिवाजी मामडगे याने त्याच्या जवळील चाकूने तक्रारदाराच्या हातावर वार केला. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ जखम झाली. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनी तक्रारदाराची पत्नी, आई व शेजारच्या व्यक्तींनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. विष्णू येमले याला बेल्टने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच मोटारसायकलवर दगड मारून त्याचे नुकसान केले. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































