केडगावच्या स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार; दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल

453

केडगावमधील इंदिरानगर येथील स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्य वितरण पथकाकडून रेशन धान्याची तपासणी करीत असताना 12.73 क्विंटल गहू व 9.0475 क्विंटल तांदळाचा तफावत साठा आढळून आला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात स्वस्त धान्य दुकानदार शिल्पा दिलीप पटेकर, सचिन दिलीप पटेकर (दोन्ही रा. इंदिरानगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकातील सदस्यांना सचिन पटेकरने ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक घनशाम रामचंद्र गवळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिल्पा पटेकर यांच्या नावावर असलेल्या इंदिरानगर येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशन धान्याची पडताळणी करीत असताना पुस्तकी साठा व प्रत्यक्ष साठा यातील 12.73 क्विंटल गहू व 9.0475 क्विंटल तांदळाची तफावत आढळून आली. तसेच धान्याचा काळाबाजार करून लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. रेशन धान्याची पडताळणी करीत असताना सचिन पटेकर याने ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या