नोकरी देण्याच्या आमिषाने सातजणांना 58 लाखांचा गंडा; राहात्यात दोन शिक्षकांसह तिघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलाठी व शिक्षक म्हणून नोकरीला लावून देतो, असे सांगून सातजणांची 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन शिक्षकांसह तिघांविरुद्ध राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटची सूत्रधार नाशिक जिल्ह्यातील महिला व तिचा पती असून, सर्वजण फरार झाले आहेत. दिनेश गोविंद सोनवणे, पत्नी बिना दिनेश सोनवणे-गायकवाड, भाऊसाहेब पांडुरंग पेटकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज प्रकाश पाटील (रा. साकुरी, ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे.

धीरज पाटील हे साकुरी येथे राहत असताना बिना व दिनेश यांच्याशी त्यांची ओळख झाली. पाटील पती-पत्नीने धीरज यांना रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये, सुधाकर जाधव यांना तलाठी म्हणून नोकरी लावण्यासाठी 10 लाख 44 हजार, प्रगती किरण खंडागळे यांच्याकडून 2 लाख, घनश्याम शिवदास खैरनार यांच्याकडून 8 लाख, सागर कांतिलाल खैरनार 3 लाख, अरुणा गणेश पडवळ 6 लाख 40 हजार, संजीवनी सोनवणे 3 लाख 10 हजार, कल्पेश रमेश पथके 5 लाख अशी सातजणांकडून विविध खात्यांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 57 लाख 94 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.