राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार! सरकारचा महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शहरे, वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राह्मणवाडी, माळीगल्ली अशी आहेत. मात्र यापुढे ही नावे राज्यात कुठेही दिसणार नाहीत. सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळीत राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आला.

राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नसल्याने यापुढे या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच अन्य नावे देण्यात येतील.

दलितऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध

यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.

राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत  `Scheduled Caste & Nav Bouddha’ आणि मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती व नव बौध्द’ या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.