सीबीएसई दहावीचे गुणांकन जाहीर, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागणार निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या गुणांकनाचे निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात येणार आहे. मे महिन्यात मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रलचलित धोरणांनुसार सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षा 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन या आधारे होते. यंदाही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन 100 गुणांच्या आधारे होणार आहे. विद्यार्थ्यांचे 20 गुणांचे मूल्यांकन प्रचलित नियमांनुसार आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांच्या आधारे याचे गुणांकन करावे, असे मंडळाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी जाहीर केले. यासाठी मंडळाने वेगवेगळे निकष जाहीर केले आहेत. मंडळाने परीक्षा रद्द केल्याने 80 गुणांचे मूल्यांकन शाळांनीच करायचे आहे. हे मूल्यांकन शाळांनी वर्षभरात घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून करायचे आहे असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. हे सर्व मूल्यांकन पूर्ण करून सर्व माहिती 11 जूनपर्यंत मंडळाला सादर करण्यात यावी असे पत्रकात म्हटले आहे.

मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन करण्यात येणार असून यात मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असणार आहे. हे शिक्षक गणित, समाजशास्त्र्ा, विज्ञान आणि दोन भाषा विषयांचे असतील. दोन शिक्षक हे बाहेरील शाळेचे असणार आहेत. बाहेरील शाळांतील शिक्षकांना 2500 रुपये मानधन देण्यात येणार आहे, तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी 1500 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

1 जूनला बारावीचा निर्णय

बारावीच्या परीक्षेचा निर्णय 1 जूनला घेण्यात येणार आहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आला असून तो विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाइटवरून अपलोड करता येणार आहे.

असे असतील 80 गुण

  • चाचणी परीक्षा – 10 गुण

  •  सहामाही परीक्षा – 30 गुण

  • सराव परीक्षा – 40 गुण