
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईच्या दहावी बोर्डाने पहिल्या सत्राचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा दिली होती. त्यात 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तिरुवनंतपुरम विभागाचा निकाल सर्वोत्तम लागला असून तेथील 99.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसी दहावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सरासरी 94.99 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 92.95 टक्के आहे. यामध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही 91.30 टक्के निकालासह यंदा उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सत्र 2 म्हणजेच दुसरी बोर्ड परीक्षा 5 मे ते 1 जून दरम्यान होणार आहे. सत्र – 2 परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे गुण सुधारण्यासाठी दिलेली एक संधी आहे. यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.
रिझल्ट कसा तपासावा
विद्यार्थ्यांना results.cbse.nic.in, cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in, umang.gov.in या वेबसाईटवर रिझल्ट तपासता येणार आहे. त्याशिवाय उमंग अॅपचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये UMANG अॅप डाऊनलोड करून खाते तयार करायचे आहे. त्यानंतर नोंदणीकृत नंबरने लॉग इन करून सीबीएसई 10 वीचे निकाल 2026 लिंकवर क्लिक करावे. तेथे रोल नंबर टाकून सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर सीबीएसई बोर्ड सत्र – 1 चा निकाल दिसेल.



























































