
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल 99.37 टक्के इतका लागला. 12 लाख 96 हजार 318 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 70 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलांचे प्रमाण 99.13 टक्के इतके आहे.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठी 13 लाख 69 हजार 745 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 13 लाख 4 हजार 561 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. या परीक्षेला बसलेल्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रथम वर्ष अॅडमिशन प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितले आहे. 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असेही निर्देश यूजीसीने दिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरू करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला होता. त्यासाठी 30ः30ः40 असा फॉर्म्युला वापरला गेला. यामध्ये दहावीतील गुणांचे 30, अकरावीतील गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सीबीएसई, आयसीएसई आणि सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्याचे आदेश गेल्या 24 जून रोजी दिले होते.
महाराष्ट्राचा निकाल आज लागण्याची शक्यता
एचएससी बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. उद्या दुपारी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वेच्च न्यायालयाने सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या निकाल लागणे अपेक्षित आहे. सध्या राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे, या परिस्थितीत निकाल लावयाचा की नाही याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.


























































