CBSE चे गुणवंत घटले, दहावीचा एकूण निकाल 91.46 टक्के

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा एकूण निकाल 91.46 टक्के लागला आहे, गेल्यावर्षीपेक्षा यंदा निकालात किंचित वाढ झाली असली तरी देशभरात 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंतांची संख्या घटली आहे. यंदाच्या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून 98.05 टक्के निकालासह पुणे विभाग देशात चौथ्यास्थानी आहे.

देशभरात एकूण 18 लाख 73 हजार 15 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी 17 लाख 13 हजार 121 विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात केवळ 0.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीप्रमाणे दहावीचीही गुणवत्ता यादी सीबीएसईने जाहीर केलेली नाही.

त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक निकाल

देशात त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.28 टक्के इतका लागला आहे. दुसऱ्या स्थानी चेन्नई विभाग असून चेन्नईचा निकाल 98.95 टक्के आहे. तिसरे स्थान बंगळुरू विभागाने पटकावले असून बंगळुरू विभागाचा निकाल 98.23 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल 98.05 टक्क्यांसह पुणे विभाग असून 96.93 टक्के निकालासह अजमेर विभागाने पाचवे स्थान मिळविले आहे. सर्वात कमी निकाल गुवाहाटी विभागाचा 79.12 टक्के लागला आहे.

केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक 99.23 टक्के लागला आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा हा निकाल कमीच आहे. त्याखालोखाल जेएनव्हीचा निकाल 98.66 टक्के इतका लागला आहे.

यंदाच्या बारावीच्या निकालात दिल्ली विभाग चौथ्या स्थानी होता. मात्र दहावीच्या निकालात दिल्ली विभाग पिछाडीवर पडला आहे. हिंसक आंदोलने व त्यानंतर लॉकडाऊनमुळे दिल्ली विभागात दहावीच्या काही विषयांची परीक्षा होऊ शकली नाही.

पश्चिम दिल्लीचा निकाल 85.96 तर पूर्व दिल्लीचा निकाल 85.79 टक्के इतका लागला आहे. दोन्ही विभागांनी देशात अनुक्रमे 14 वे आणि 15 वे स्थान मिळविले आहे.

मुलीच सरस

सीबीएसईच्या दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून 93.31 टक्के मुली तर 90.14 टक्के मुले पास झाली आहेत. टन्र्सजेंडर विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा कमालीची घसरण पहायला मिळाली त्यांचा निकाल तब्बल 15.79 टक्क्यांनी घसरला. गेल्यावर्षी 94.74 टक्के निकाल लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या