
सामना प्रतिनिधी । बीड
पोलीस दप्तरी होणारी गुन्ह्याची नोंद बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता विशिष्ट संगणकीय प्रणालीद्वारे संग्रहित केली जाते. बीड पोलीस दलाने या कामात आपला वेगळा ठसा उमटवत कार्यालयीन कामकाज ’पेपरलेस’ करण्यावर भर आहे. स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) मध्ये उत्कृष्ट डेटा एन्ट्री करणार्या पहिल्या तीन घटकांची यादी प्रत्येक महिन्याला जाहीर केली जाते. या यादीमध्ये जुलै 2018 मध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्रातून तिसरे स्थान पटकावले होते तर नुकत्याच ऑगस्ट 2018 मध्ये बीड डिस्ट्रीक्ट क्राईम रेकॉर्ड ब्युरोने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सीसीटीएनएस (क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग ऍन्ड नेटवर्क सिस्टीम) हे सॉफ्टवेअर गृह मंत्रालय, केंद्र सरकारकडून पोलीस दल व त्यांच्या दैनंदिन कामकाजातील गरजा यासाठी विप्रो या सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने विकसित करण्यात आलेले असून ते देशातील सर्व राज्यातील पोलीस विभागाचा विचार करून विकसित करण्यात आलेले आहे. या सॉफ्टवेअरला देशात प्रभाविपणे चालविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) नवी दिल्ली हे कामकाज पाहतात. या सॉफ्टवेअरमध्ये येणार्या समस्यांचे समाधान करतात. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एससीआरबी) पुणे हा प्रकल्प राबवत आहे. मुख्यमंत्री स्वतः कामकाजाचा आढावा घेतात. या सॉफ्टवेअरमध्ये पोलीस ठाण्यात चालणारे सर्व कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने सर्व ठाण्यांचे रेकॉर्ड अद्यावत केले जाते. एससीआरबी पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातून सीसीटीएनएसमध्ये उत्कृष्ट डेटा एन्ट्री करणार्या पहिल्या 3 घटकांची यादी प्रत्येक महिन्याला तपासली जाते. या यादीमध्ये जुलै 2018 मध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्रातून तिसरे स्थान पटकावले होते तर नुकत्याच ऑगस्ट 2018 मध्ये बीड डिस्ट्रीक्ट क्राईम रेकॉर्ड ब्युरोने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल या विभागातील पो. नाईक निलेश ठाकूर, पो. नाईक अनिल डोंगरे, पो. कॉ. महाविर सोनवणे तसेच विप्रो कंपनीचे समन्वयक मनोज तिडके यांचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी अभिनंदन केले आहे.
असे चालते कामकाज
सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत देश, राज्य आणि जिल्हास्तरावरील प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांचे रेकॉर्ड तसेच या गुन्ह्यासंबंधीच्या तपासाचे कागदपत्रे या सॉप्टवेअरच्या माध्यमातून अपलोड केली जातात. शिवाय पोलीस ठाण्यांना येणार्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातात. या कामकाजात राज्यात बीड डिस्ट्रीक्ट क्राईम रेकॉर्ड ब्युरोने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.
































































