
राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर
सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत अशा परीक्षा केंद्रांवर अन्य शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून केंद्र संचालक व सर्व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र संचालक, परीरक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत बहुतांश परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही कॅमेऱयांची पूर्तता केली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या संख्येत बदल होऊन कॅमेरे नसलेल्या केंद्रांची संख्या 58 वरून 11 इतकी कमी झाली असल्याची माहिती मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली आहे.


























































