
>> मनोज रानडे
दीड महिन्यापासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून जगतोय. आज झालेल्या शस्त्रसंधीमुळे दिलासा मिळाला. आता दोन आठवडे तरी काही नसेल, मात्र तरीही काही सांगता येत नाही. पुढे काय होईल ते देवच जाणे… ….ही भावना व्यक्त केलीय दुबईत अडकून पडलेल्या मराठी बांधवांनी.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका इस्त्रायलने इराणमधील विविध ठिकाणे आणि शहरांवर अचानक हवाई हल्ले करून युद्ध सुरू केले. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि इतर अनेक इराणी अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक नागरिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या इराणने अमेरिका, इस्रायलवर तुफानी हल्ले चढविले.
इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करताना दुबई आणि आबुधाबीला लक्ष्य केले. दुबईतील ‘फेअर मन्ट द पाम’ या हॉटेलसह विमानतळ आणि अमेरिकेतील उच्च पदस्थ राहत असलेल्या इमारतींवर इराणने क्षेपणास्त्र डागली.
यूएस, सौदी अरब, जॉर्डन, कतार, बहरीन येथेही जबरदस्त हवाई हल्ले चढविले. त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता.
आशिया आणि आखातातील आठ देशांनी आपल्या हवाई हद्दी बंद केल्याने विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली. त्यामुळे मराठी बांधवांसह अन्य देशांतील हजारो नागरिकांना तेथेच अडकून पडावे लागले. आता येईल त्या परिस्थितीचा सामना करणे, एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने खुली न केल्यास एका रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदत संपण्यापूर्वीच हल्ले सुरू झाले. मात्र, इराणने ते धुडकावून लावले. इराणमधील सर्व जनतेने बलिदानाचा निर्धार केला. त्यामुळे आखाती देशच नव्हे; तर सर्व जग चिंतेत पडले होते.
दुबई आणि आखातात स्थायिक झालेल्या मराठी माणसांची संख्या सुमारे दोन ते अडीच लाख आहे. साता समुद्रापार असले तरी या मराठी बांधवांनी मराठी अस्मिता जपली आहे. श्री गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि इतर सण, उत्सव हे मराठी बांधव अत्यंत जल्लोषाने साजरे करतात. युद्धामुळे मात्र या शांततेला ग्रहण लागले. अमेरिका-इस्त्रायलने दीड-दोन महिन्यांपूर्वी इराण विरुद्ध युद्ध पुकारले. रोज दिवस-रात्र परस्परांवर बॉम्ब हल्ले, क्षेपणास्त्र, ड्रोनद्वारे हल्ले सुरूच होते.
अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांना इराणने टार्गेट केले. इराणने दुबई, विमानतळांवर भीषण हल्ले केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद करण्यात आली. नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
गेल्या महिनाभर ड्रोन हल्ले सुरू होते. सगळीकडे आग आणि धुराचे साम्राज्य पसरले होते.
मात्र, आज युद्धविराम मिळाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, असे या मराठी बांधवांनी सांगितले. पण एकंदरीत परिस्थिती पाहता कधी काहीही होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडिया वापरास बंदी
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा गैरवापर होऊ नये, यासाठी तेथील सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना मायदेशात संपर्कही साधता येत नाही. सोशल मीडियाचा वापर केल्याचे आढळल्यास दोन मिलियन दिरहमचा (भारताचे ५ कोटी ५ लाख ७० हजार रुपये) दंड ठोठावण्यात येत आहे.





























































