
सामना प्रतिनिधी । जम्मू
हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या जबरदस्त स्ट्राईकमुळे बिथरलेल्या पाकड्यांकडून सीमेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. संध्याकाळी सहापासून पाकिस्तानी सैन्याकडून मेंढर, राजौरी, पूंछ, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर ‘हॉवित्झर 105 एमएम’ या तोफांचा मारा करीत सीमेवरील नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. दरम्यान आठ दिवसांत पाकड्यांची 60 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यात एक महिला व तिचा मुलगा-मुलगी यांचा मृत्यू झाला तर नवऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत.
























































