जिवलग…मुक्ताची नन्ही परी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर,[email protected]

झेंडू मुक्ता बर्वे. मुक्ताची लाडाची लेक. संपूर्ण घरात तिचाच रुबाब चालतो.

कसलं क्यूट पिल्लू आहे गं!’’ ‘‘ए प्लीज तू करच झेंडूवर आर्टिकल’’. ‘‘अगं पण बहुतेक तो पुण्यात असतो.’’ ‘‘अगं ऑटिटय़ूडच काय करशील त्याच्या?’’ ‘‘फोटो बिटो नाही हं काढू देणार तो…’’ बापरे… झेंडूला न भेटताच मी फूल झेंडूमय झाले होते आधीच… आमच्या अनेक मित्रमैत्रिणींना त्याच्याबद्दल इतकं सांगितलं होतं की, जेवढी उत्सुकता अनेक दिवसांनी मुक्ताला भेटण्याची होती तेवढीच फर्स्ट टाइम झेंडूला भेटण्यात होती. अत्यंत संवेदनशील, सक्षम अभिनेत्री… सामाजिक जाणिवा ठेवून जगणारी उत्तम व्यक्ती म्हणून आपण तिला पाहिलंय, पण झेंडूची आई आहे तरी कशी? जरा शिस्तीचीच, पण प्रचंड प्रेम आणि योग्य ते लाड पुरवणारी… जीवापाड जपताना जीव ओवाळून टाकावा अशी…

तर… अगं… ऍक्चुअली लहानपणापासूनच आमच्याकडे मांजर होतीच. होतीच म्हणजे यायची ती. कुणी आमच्या दारातच सोडून गेलंय. कुणी गच्चीवर ठेवलंय. शाळेतून येताना माझ्या मागे मागे आलंय. बाहेरून आईच्या मागे आलंय. कुणी शिफ्ट होतंय म्हणून आमच्याकडे सोडून गेलंय. अशी मांजरं यायची आमच्या घरी. त्यामुळे त्यांचा सहवास आणि सवय खूप आधीपासूनच होती. मांजरांची परंपराच होती साधारण मी 8 वर्षांची असल्यापासून. अर्थात स्ट्रे कॅट्सच. हे सगळं पुण्यात असताना.

zendu-12

मुंबईत शिफ्ट झाले आणि मांजरांसारखी मी 7-8 घरं बदलली. त्यामुळे त्यांना कुठे ठेवू प्रश्नच होता. अनेक वर्षे घरात कुणी पेट नव्हतंच. गोरेगावला सोहाबरोबर शिफ्ट झाले. थोडा वेळ देता येणं शक्य आहे असं वाटलं त्या क्षणी ठरवलं दोघींनी की, मांजर यायला हवं बाबा घरी. एक तर कुत्र्यांइतकं त्यांचं करावं लागत नाही आणि अत्यंत बिझी शेडय़ूलमध्ये माऊबाचं शक्य होतं. सोहा रेग्युलर फॉस्टेरिंग करत असल्याने तिने आधी अनेकांना सांगून ठेवलं होतं आणि आलं बाबा एक माऊ सांगून… आम्ही जाम तयारी केली. जिच्याकडून येणार होतं तिला सवयी बिवयी विचारल्या. काय आवडतं काय नको विचारलं. बेड बिड केला. इन्स्पेक्शनला लोक येणार म्हणून घर एकदम चकाचक केलं. माऊच्या सोयीनं थोडे बदल केले घरात. आम्ही आळीपाळीने घरात थांबायला लागलो. आम्ही नसलो तर मित्रमैत्रिणींना रिक्वेस्ट करून करून बसवायला लागलो आणि बरेच दिवस कुणीच आलं नाही. त्या मुलीने आमचे फोन उचलणं बंद केलं. शेवटी बाहेरून कळलं की ते माऊ तिलाच ठेवायचं होतं. शी… अस्सा हिरमोड झाला.

पण मग अचानक मी शूटिंगला असताना सोहा जाऊन हे टर्किश व्हॅन कॅलिको घेऊन आली घरी. मला फूल सरप्राईज. बापरे… बघितल्यावर इतकी एक्साईट झाले. खूप खूप आनंद झाला होता. ते साडेतीन महिन्याचं गोबरं गोबरं बाळ हातात पहिल्यांदा घेतलं. खूप खूप फोटो काढले आधी. स्मोकी रंगाचं कॉम्बिनेशन असल्याने हिला स्मोकीच म्हणूया ठरलं. तासाभराने तिला भेटायला म्हणून आमची एक मैत्रीण आली आणि बाई सापडेचना… घरभर शोधलं. तशी जागा नवीनच असल्याने कुठे जाईल, काहीच अंदाज नव्हता. चुकून बाहेर गेली का बघितलं. अर्धा तास शोधलं आणि ही दोन गाद्यांच्या मध्ये बसली होती. देवा… जीव असा भांडय़ात पडला ना… साधारण असे तिचे राजेशाही नखरे बघून ‘जोधा’ नाव ठेवू असं ठरलं. कारण स्मोकी आवाज दिला तर काही लक्षच द्यायची नाही. जोधाही बहुतेक तिला आवडलं नसावंच. कारण जोधा म्हटलं की, इग्नॉर करायची. आता काय… झेंडूच्या फुलासारखी प्रसन्न दिसतेस म्हणून झेंडू म्हटलं तर उडी मारून मांडीवर आली… आणि ती आमची झेंडू झाली.

अं हं… आल्यावर सेटल बिटल व्हायला वेळ नाही लागला बाईंना… आणि बाईंना भेटायला म्हणून अनेक फ्रेंड्सची बाळं यायला लागली. कुणाची माऊ, कुणाचे कासव, कुणाचा डॉगी. त्यामुळे त्यांनाही व्यवस्थित ऍक्सेप्ट वगैरे करायला लागली. पण मधुगंधाच्या टप्पूशी काही आमचं नाही जमलं. ठपकन थोबाडीत मारायची आणि ओरडलं की रुसायची, रागवायचीच की… टेबलाखाली जाऊन बसायची. उगीच नाही जोधा ठेवलं होतं तिचं नाव. घरी आल्यावर सगळं शेडय़ूल बाळाप्रमाणे झालं. आई बाबा पण घरी मुंबईला आले की, मज्जा पिलूची. खरं तर मी आणि सोहा दोघींनी मिळून झेंडूला आणलं होतं, पण काही केल्या सोहाच्या बाकीच्या पिल्लांबरोबर मिक्स होईना. बाहेरच नाही यायची… मग हळूहळू आपसूक ती झेंडू मुक्ता बर्वे झाली. आमचा लाडोबा मोठ्ठा व्हायला लागला. पण माझं आऊटडोअर शूटिंग वाढलं. सोहा तिच्या दुसऱया घरात शिफ्ट झाली. झेंडूला घरात एकटं ठेवणं मला नाही आवडायचं. सो फायनली ती पुण्याला शिफ्ट झाली. आईबाबांकडे. माझा जीव वरखाली होत असताना लाडोबाला मात्र पुण्यात एकदमच मजा यायला लागली. माझ्यापेक्षाही अति लाड पुरवणारी आजी आणि आजोबा दिमतीला हजर होते. अर्थात एक दिवसाची सुट्टी असली तरी धावत पिलाला भेटायला मी पुण्याला पळतेच. कधी कधी महिनाभर आईबाबा तिला घेऊन येतात… आणि दिवसागणिक मोठी होणारी माझी झेंडू मला मिठी मारून बसते ना…

मी गेले ना की सगळं सांगायचं असतं मला… पूर्वी इतकी नाही बोलायची. आता समोरच्याला बोलू देत नाही. तिचं ठरलेलं रुटिन आहे. मी गेले की, मीच उचलून घ्यायचं. बाकी कुणी नाही. सकाळच्या वेळी तृप्ती नावाची हेल्प येते आमच्याकडे. तिनेच खेळायचं. बरं, फक्त म्हणजे फक्त तृप्ती. लहान मुलं आम्हाला अजिबात नाही आवडत. त्यामुळे तृप्ती तिच्या भाच्याला घेऊन आली की ही फुरंगटून टेबलाखाली बसणार… जेवण आजीनंच द्यायचं. रात्री झोपताना आजीच्या (म्हणजे माझ्या आईच्या) हातात घट्ट पंजा रोवणार आणि झोपणार. सकाळी सकाळी फक्त एकच पापी आजोबांना मिळणार… फक्त आणि फक्त ताजंच जेवण जेवणार. मग ते ट्रीट असो किंवा रॉयल कॅनन. अवास्तव काही खाणार नाही. कारण आम्ही खूप फिगर आणि डाएट कॉन्शस आहोत बाबा… इतर दोन ट्रीटनंतर तिसरीकडे बघतही नाही. पाणी शक्यतो नळाचंच डायरेक्ट पिणार. पाणी हवं असेल तर बाथरूममध्ये जाऊन हाका मारणार. मग आपण जाऊन नळ सुरू करायचा. ही मग थेंब थेंब पिणार… झालं की सांगणार. आजकाल महाडांबरट झालीय, पण… तिला इग्नोर केलं की, मुद्दाम नळ सुरू करायला सांगते आणि आपण गेलो की, पळत येऊन सोफ्यावर बसते डांबरट. सो…फा… सकाळी सकाळी सोफ्यावर ऊन खात बसायला आम्हाला आवडतं.

सध्या एक नवा खेळ आहे. छोटय़ा बास्केटमध्ये बसायचं. आपल्याला आणून दिलेली दोरी त्या बास्केटला बांधायची आणि ओढत ओढत घरभर फिरायचं. आम्हाला खूप गरम होतं. ए.सी. लागतोच. हिच्यामुळे घरात पहिला एसी आला. फर्स्ट टाइम ग्रुमिंगसाठी नेलं होतं तर तिने छान करून घेतलं. पण मी बाहेर येरझाऱया घालतेय. हिला आवडेल का? रडेल का? अशा अनेक विचारांनी… एकदा घरी ग्रुमरला बोलावलं ना, हिला तो आवडलाच नाही. म्हणून थोबाडीत ठेवून दिली.

अटेंशन सिकिंग तर विचारूच नकोस. घरी नाटकाचं वाचन होतं. सगळे गोल करून वाचणाऱया व्यक्तीकडे तोंड करून बसलो. वाचणाऱयांकडे लॅपटॉप आणि त्यात बघून वाचतोय… ही घुटमळली. बघितलं जवळ जाऊन… कुणीच भाव देईना म्हटल्यावर मागून गेली आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर पंजा मारायला लागली. वाचूच देईना. मग सगळ्यांनी बळंच तिचं कौतुक केलं. तेव्हा बाजूला जाऊन बसली ठमाकाकू… दुसऱया दिवशी तिला मी तिथेच ठेवून मुंबईला आले, तर नाराज होती दिवसभर. जेवली नाही. तेव्हा जाणवलं, हिला घेऊन यावं इथं. सो, नुकतंच मोठं घर घेतलंय इथे. तिच्यासाठी एक खोली डेकोरेट केलीय. डेकोरेटपेक्षा कॅटफ्रेंडली. भिंतीलगत चढून जायला पायऱया बनवल्यात. बेड आहे, अनेक खेळणी आहेत. नाडय़ा आहेत. बाटलीची बुचं आहेत. तिला आवडणारा तिचा उंदीर घेऊन आले की, झालं. अर्थात खेळण्यातला… अनेक दिवस अनेक गोष्टी तिच्या बरोबरीने करायच्या राहून गेल्यात. आता आली की, येईल खूप मज्जा, पण प्रवास मात्र आवडत नाही बाईंना… अर्ध्या तासातच चिडचिड करायला लागतात. मग समजावून झोपवावं लागतं आणि पुढचा प्रवास… शी-शूचं व्यवस्थित कळत असल्याने आणि मुळातच स्वच्छताप्रिय… अतिप्रिय असल्याने ते एक सांगते बाबा…

लहान असताना अस्ताव्यस्त होऊन पकडायची… छान गोबरा गोबरा गोळा बघून बरं वाटायचं. आत्तासुद्धा बघ, ती आली ना… की दिवस अपुरा पडणार आहे. शूटिंगला दांडी मारावीशी वाटणार आहे. नुसती तिच्याशी मस्ती करावीशी वाटणार आहे… लहानपणी तिला म्हणायचे तेच गाणे आज म्हणावंसं वाटतंय. ‘मेरे घर आयी एक नन्ही परी, एक नन्ही परी’… थँक यू मुक्ता, लव्ह टू झेंडू..