जिवलग… शिवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर,[email protected]

दिग्दर्शक विशाल इनामदार… छोटय़ाशा शिवाने विशालला पार बदलून टाकलंय… आपल्या बाळाच्या बाबतीत हळवं होणं… पझेसिव्ह होणं हे सगळं तो अनुभवतोय…

अय्या तिला बाळ होणारे?’ ‘वा… गं काँग्रॅच्युलेशन्स… कधी डिलिव्हरी?’ ‘सो, सो क्यूट शी इज प्रेग्नंट…’ ‘वा… घरी छोटी छोटी पावलं येणार…!’ ‘प्रेग्नन्सी ते डिलिव्हरीचे ते 9 महिने… घरात एकदम तय्यारीचं वातावरण असतं. बाळाची अंगडी टोपडी, स्वेटर… मिटन्स… बाटल्या… शेवटच्या महिन्यात तर पळापळ

गंमत वाटली की, बाळ येणारे म्हणून इतकी तयारी करतो… तरीही बऱयाचदा ती अपुरीच पडते. अचानक पेटचं पिल्लू घरी येतं तेव्हा इतकीही तयारी नसते आपली… बऱयाचदा माहितीही नसतात. बाळाचे सोपस्कार तरी छोट्टंसं पिल्लू ऍडजस्टच करून घेतं आपल्याला. असंच क्यूटसं सरप्राईज विशाल इनामदार याने सुचित्राला दिलं. ‘खूप दिवस सुचित्रा मला एक लॅब्राडोर हवा असं सांगत होती. सुचित्राने केलेलं एक शूट खूपच ऍप्रीसिएट झालं. तिने डायरेक्ट केलेल्या एका प्रोमोची खूप वाहवा झाली. वाटलं हीच ती वेळ, हाच तो क्षण… मित्रांबरोबर एका ब्रीडरकडे गेलो. खूप रात्र झाली होती खरं तर… पण त्याने एक गोंडस गोल्डन-क्रिमिश रंगाचं इवलंसं अवघ्या 33 दिवसांचं पिल्लू मांडीवर ठेवलं. आईशप्पथ… त्याच्याशी खेळलो, त्याला कुरवाळलं आणि हेच ते… 3 ते 6 दिवसांत पिल्लू येईल तुमच्याकडे असं सांगितलं ब्रीडरने. पण सोडवेचना त्या गोंडूला… बरं घरी न्यावं तर आई कुत्र्यांना प्रचंड घाबरायची. इतक्या रात्री घरी तिचं टेन्शन वाढवायचं नव्हतं. पण याला इकडे सोडून पण जाता येत नव्हतं. फार विचार करत बसलो असतो तर काहीच घडलं नसतं. उचललं… गाडीत घालायच्या आधी काय भरवायचं, कसं भरवायचं, शी शू वेळा… सगळं सगळं जवळजवळ बाळाला डिस्चार्ज द्यायच्या आधी बाबाचा बाबा झालो होतो.

थोडासा भांबावलेला आणि प्रचंड आनंदी… सरळ त्याला ऑफिसमध्ये घेऊन आलो. खरं तर खूप पेपर्स इकडे तिकडे पसरले होते. पण छानसी एक जागा केली आणि तिथे बेड टाकून झोपवलं शिवाला…! शिवा का? असंच… एक तर इंडियन नाव हवं होतं आणि तितकंच स्ट्राँग पॉझिटिव्ह… बघ ना गंमत आहे नावात… हां… तर रात्रभर मी आपला बाजूला बसून. सुचित्राला सांगितलं की, आलं बाबा बेबी आपलं, तर रडायलाच लागली. साहजिकच खूप वर्षांनी तिला घरा एक पेट मिळणार होता. पॉमरियन होता तिच्याकडे, पण तो गेल्यानंतर ती खूपच कठीण मनःस्थितीतून गेली. अनेक दिवस… सो तिच्यासाठी शिवाचं येणं खूप खूप आनंदाचं होतं. दोन दिवस सलग शूट संपवून धाव्वत ती स्टुडिओमध्ये आली आणि म्हणाली आता घरी घेऊन जाणारे याला… तोपर्यंत असं पझेसिव्ह, अटॅच्ड वगैरे काही वाटत नव्हतं किंवा वाटत होतं, पण ते जाणवत नव्हतं. मी म्हटलं, अगं आता नको नेऊस. असं कसं डायरेक्ट घेऊन जाणार तू? रडूच यायला लागलं. दहा दिवस त्याला ऑफिसमध्येच ठेवलं होतं. दिवसातले 22 तास त्याच्याबरोबर होतो. पाच वेळा स्वतः जेवण बनवून भरवायचो. त्याची शी शू क्लीन करायचो. घेऊन फिरायचो आणि आता उद्या हा सुमित्राच्या घरी जाणार… जरा कठीणच गेलं. खरं तर मी तसा पटकन अटॅच होणारा, हळवा वगैरे नसतानाही…

फायनली शिवा… सुचित्राकडे गेला… पण आजही दर दिवसाआड मी त्याला भेटायला जातो. शनिवार, रविवार तो माझ्याच बरोबर असतो. शिवा आल्यापासून माझ्या आईचीसुद्धा भीती कमी झालीये… आणि मुख्य म्हणजे माझ्या ड्रायव्हरची… त्या 33 दिवसांच्या पिल्लाजवळ 2 तास बसायला सांगून जाताना त्याचा चेहरा काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखा घाबरलेला असायचा. आज तोच ‘चल शिवा घुमके आते हैं’ म्हणतो.

तर… फायनली शिवा सुचित्राकडे गेला. तिचे आई, बाबा, ताई आणि ती यांनी खरं तर त्याला छान शिस्त लावली. अर्थात वीकेण्डला तो उधळतोच माझ्याबरोबर… पण सकाळी 5 वाजता उठून तो खाली फिरायला जातो. तसं त्याचं ठरवून घेतलेलं टायमिंग आहे. त्याला माहितीय ठरावीक व्यायामप्रकार वा आसनं संपलं की मग खाली जायचं असतं. आजोबांचं… त्यापलीकडे जर काही ते अजून करायला गेले किंवा वेळ लावला तर तो पायानं त्यांना सांगतो की, चला आता तुमचं झालंय. फिरून आला की झोपणं हा कार्यक्रम असतो. मग 7.30 वाजता आम्ही आमचं फर्स्ट मिल ऑफ द डे घेतो. मग आम्ही घरात असेल त्याच्याबरोबर खेळतो. 10 वाजता थोडं खातो. 12 वाजता जेवण… आणि मग रात्री 8 वाजता. रात्रीपण फिरायला जातो आम्ही. बिल्डिंग व सोसायटीमध्ये आमचे खूप मित्र मैत्रिणी आहेत. आहात कुठे…? व्हॉट्सऍप ग्रुप आहे या पेटस्चा… वेळोवेळी सगळय़ांचे बर्थडेज, स्पेशल डेज छान सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतात. त्यांच्यासाठी खास डॉग केक किंवा पेस्ट्रीज मागवल्या जातात. रिटर्न गिफ्ट म्हणून ट्रीटस् दिल्या जातात. टोप्या बिप्या… काही विचारू नकोस.

राईस, चिकन, ट्रमस्ट्रीक्स आमचं अत्यंत आवडतं जेवण. आईक्रीम म्हटलं की आपले कान असू तिथून टवकारले जातात… आणि नुसते टवकारत नाही तर ते पोटात जाईलच इतका हट्टही केला जातो. खरं तर शिवा चरबट नाहीच. त्याच्या कोटची, स्कीनची काळजी घेण्यासाठी ठराविकच गोष्टी त्याला खायला देतो. अॅपल वा केळं अशी फळं अधूनमधून देतो. आंघोळीची तर प्रचंड म्हणजे प्रचंड आवड. विकेण्डला त्याला बाहेर घेऊन गेलो की फार्महाऊसवर तर चंगळच असते. मोकळं रान मस्ती करायला… हुंदडायला, उन्हात लोळायला… खास त्याच्यासाठी कारच्या मागे बसणारी डॉग सीट घेतलीय. पाळण्यासारखी. तिथून ब्रेक लावला तरी तो पडत नाही. झोपू शकतो त्यात. फिरू शकतो. खरं तर पूर्वी कारमध्ये एकटं बसायला घाबरायचा तो. त्याला गाडीत ठेवून समोर औषध आणायला गेलो तरी भिरभिरायचा. पण आता कार सीट आणि रेग्युलर ट्रॅव्हलिंगमुळे धीट झालाय. एकदा त्याला घेऊन कोकणात आंजर्ल्याला गेलो होतो मित्राच्या घरी. शिवाचा पहिला पाऊस. पहिला समुद्राचा अनुभव. शिवा जरा सावरून वागतो. त्यामुळे आधी त्याने पाण्याच्या लाटांचा अंदाज घेतला. या फक्त येऊन धडकताहेत अशी खात्री पटल्यावर एवढं एन्जॉय केलं की मी पण जरा खोल पाण्यात जाण्याचं धाडस केलं शिवामुळे… अर्थात पट्टा हातात घेऊनच. पहिल्या पावसात मनसोक्त भिजला. थोडक्यात ट्रिपला गेलेल्या सगळ्या मुलांनी राडा घातला.

माझ्या फार्महाऊसवर त्याचे दोन मित्र झाले होते. एक रस्त्यावरचा कुत्रा आणि एक माकड. गेलो की धाव्वत त्याला भेटायला यायचे. शिवा पण त्याची खूप काळजी घ्यायचा. एकदा असंच ते पिल्लू धावत आलं. आणि बाजूने दुसरा कुत्रा येऊन शिवाला चावला. मला माहीतच नव्हतं. ते पिल्लू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं, पण कळत नव्हतं. दुपारी जेव्हा शिवाला जवळ घेतलं तेव्हा हाताला रक्त लागलं. मी खूप घाबरलो. ऍण्टी रॅबीज वगैरे सगळं केलं. शिवा ओके झाला. पण एकटं फार्महाऊसवर पर घेऊन जायची हिंमत पुढे अनेक दिवस होत नव्हती. खूप दिवसांनी गेलो तर कळलं की ते पिल्लू गेलं… शिवानं खूप शोधलं त्याला. वाट बघितली. पण फक्त माकडच आलं. मी रोज त्याच्याबरोबर नसलो तरी मी येणारे असं म्हटलं की तो खूप खूश होतो. विशाल इज कमिंग… व्हेअर इज विशाल असं म्हटलं की खिडकीपासून दाराशी धाव्वत राहातो. मला वाटायचं फक्त मीच त्याच्या बाबतीत पझेसिव्ह आहे. त्याचं फक्त प्रेम आहे माझ्यावर, पण एकदा माझी पाठ दुखत होती. सुचित्राला म्हटलं मार गं जरा पाठीवर… तर धाव्वत आला. भुंकायला लागला तिच्यावर. पाठीवर आडवा पडला. पाणी आलं गं त्यावेळी डोळ्यात.

गंमत ऐक अजून… रात्री 10 वाजता रोज साहेब खाली फिरायला जातात. एक दिवस असाच गेलो तर एक बॉल पायाने ढकलत ढकलत घेऊन आला. कुठेतरी मिळालेला दिसतोय म्हणून वॉचमनकडे दिला, तर हा परत दुसरा बॉल घेऊन आला. तो पण ठेवला. तिसरा घेऊन आला. मग लक्षात आलं खाली खेळायला आलेल्या मुलांचे इकडे तिकडे गेलेले हरवलेले बॉल हा शोधून आणतो. आता बिल्डिंगमधली मुलं येऊन सांगतात, अंकल मेरा बॉल मिल नहीं रहा है… ग्रीन कलर का है… शिवा को बोलो ना ढुंढने के लिए? हसून हसून संपले मी… सो क्यूट…

हो हो, सो क्यूटच प्रकार आहे अगं… आजकाल तर ऍमेझॉनवर मी, आमचे मित्र, त्यांची मुलं शिवासाठी खेळणी ऑर्डर करतो. गंमत ना! शिवाच्या येण्याने मी जरा… जरा हं… शिस्तबद्ध झालो. रिस्पॉन्सिबलर झालो. मी माणूस म्हणून बदललो. अर्थात चांगल्या अर्थानं… शिवा मेक्स मी कम्पलिट. बसलो असलो तर येऊन चाटतो. टीव्ही बघत बसलो असलो तर कुशीत येऊन झोपतो.  झोपायला जागा नसेल बाजूला तर हक्काने ढकलून ढकलून झोपतो. एक छानसी पापी देतो. सगळ्यांबरोबर त्यांच्या पायाशी झोपत असला तर माझ्या मऊ कुशीतच त्याला झोप लागते. इतकं गोड पिल्लू जेव्हा त्याला बाय म्हणून सुचित्राकडे सोडून निघतो ना… तेव्हा इतका केविलवाणा चेहरा करून बघतो की फिल्मी वाटेल, पण परत धावत जाऊन त्याला मिठी मारतो. त्याचा गरीबडा चेहरा नाही बघवत गं…!

वा… खूप मस्त वाटलंय तुझ्याशी शिवाबद्दल बोलून… माझं फादरहूड पुन्हा एकदा वळून उलगडताना किती कप्पे सापडले… किती कोपरे सापडले… नव्याने जपून ठेवायला…! आय लव्ह शिवा… थँक यू विशाल, लव्ह टू शिवा!