जिवलग…परी, कुवूची आज्जी आणि आई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर

परी… कुवू… पॉम… आणि 14 मांजरं यांची ममा, आज्जी, ताई अशा विविध भूमिका रेशम टिपणीस मनापासून पार पाडतेय…

‘‘लहानपणी जस्स घरात मी आणि भाऊ होतो तस्सचं आमचं पॉमेरिअन होतं. घरात सतत अनेक मांजरी होत्या… रस्त्यावरचे कुत्रे कधी यायचे… घर माणसांपेक्षा जास्त प्राण्यांनीच भरलेलं असायचं गं… सो अगदी पूर्वीपासून पेट्सची सवय होतीच… तेव्हा घरी आल्यावर मैत्र… मित्र… सखा म्हणून होती… आणि आज एक सोबती म्हणून आहे…’’

आमची पॉमेरिअन 12 वर्षं होती आमच्याबरोबर. सहसा असं म्हणतात की पॉम फेरोशिअल आक्रमक असतात, पण आमची इतकी फ्रेंडली आणि शांत होती ना अर्थातच भुंकायची, पण कधी कुणाच्या अंगावर बिंगावर धावून नाही गेली. अगं माझ्या जस्ट आधी वहिनीची डिलीव्हरी झाली होती… आणि मग माझी रिषिका आली… सो आईकडे असताना एकाचवेळी घरात 2 पाळणे हलत होते… ही आमची चिंगुड दोन पाळण्यांच्या मध्ये बसायची आणि जे बाळ उठेल, जाऊन बरोबर त्याच्या आईला उठवायची. त्या बाळाचं दूध पिऊन होईपर्यंत शांतपणे त्या त्या आईच्या बाजूला बसायची… आणि बाळाला पाळण्यात ठेवलं की पुन्हा 2 पाळण्यांच्या मध्ये जायची आणि बसायची… कधी तिला लिश बांधून फिरवलं नाही की कधी बांधून ठेवलं नाही. कधी शी-शू केली नाही की कधी चिडचिड… पण नको तिथे खूप त्रासानं तिला शेवटी इंजेक्शन द्यावं लागलं… अगं… तेव्हापासून मला माझा असा डॉग हवा होता.. पॉमची जागा भरून काढायला…

अनेक वर्षं काही कारणांनी ते शक्यच नाही झालं… पण जशी जशी रिषिका आणि मानव मोठे व्हायला लागले त्यांनीही हट्ट धरला… मला हवाहवासा हट्ट… वाटलं लॅबरेडॉरच आणावा… फॅमिली डॉग.. स्निफर डॉग… आणि एकदम चिअरफूल ब्रिड… सांभाळायला, वाढवायला पण मज्जा येईल. सो, आमच्या डॉक्टरने एका ब्रिडरचा नंबर दिला. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सांगितलं एका आठवडय़ानंतर बंगळुरूवरून विमानानं राजांचं आगमन होणार आहे. त्याचे आईवडिल रॅम्पवर वॉक वगैरे केलेले मॉडेल्स होते. एकदम फूल ऑन… आता येणारं बाळ कसं असणार उत्सुकता होती. 2 महिन्याचं टिपिकल लॅब रंगाचं सोनेरी… पिल्लू घरी आलं… इवलस्सं बाळ बघून रिषिका पण खूष झाली होती. 2 दिवस झाले 3 दिवस झाले… मम्मा त्याला कोणीच का घ्यायला येत नाहीये गं? तेव्हा म्हटलं, अगं आपलंच आहे हे. त्या पिल्लापेक्षा जास्त उडय़ा तिनं मारल्या होत्या तेव्हा… आणि अशा प्रकारे शेवटी आमची कुवू आमच्या आयुष्यात आली… कुवू पूर्णपणे माझी बेबी होती. सकाळी उठून तिचा ट्रेनर यायचा. पोलीस ट्रेनिंग दिलं होतं तिला… त्या ट्रेनरबरोबर मी पण जायची तिची मास्टर म्हणून ट्रेनिंग घ्यायला… 3 दिवस आठवडय़ातून तिचं खाणंपिणं एकदम स्ट्रीक्टली मेण्टेण्ड होतं… कुवूला रेशम आली होती… समजली होती… मी कधी इमोशनली डाऊन असले ना की यायची, माझ्या खांद्यावर मान टाकायची, पंजा नं गालावर हात फिरवायची, तोंडाला चाटायची. काहीही करून तू आता नॉर्मल हो… चिल यार… असं सांगत रहायची. खरं तर अगदी शेवटपर्यंत ती खूप खूप खूपच हायपर होती पण अशावेळी मात्र माझी ही डांबरट मुलगी माझी आई होऊन जायची.

अगं एकदा मी फूल रेडी झाले पार्टीला जायला… फक्त शूज घालायचे होते. ते काढले आणि टॉयलेटला गेले मोजून दीड मिनिट… बाहेर आले तर नव्या कोऱया सूजचा पार रगडा झाला होता. तो आता ‘मी पार्टी कॅन्सल करून घरी बसायचं’ म्हणून होता की ‘मी तिला सोडून पार्टीला चाल्लेय’चा राग म्हणून होता देव जाणे…

असंच एकदा मी शूटिंगवरून घरी परत आले तर मॅडमनी अख्खा सोफा नखानं फाडला होता. त्यातला स्पंज बाहेर फेकून दिला होता आणि तयार झालेल्या पोकळीत जणू स्वतःच स्पंज म्हणून बसली होती. इतकी ओरडले तिला तरी त्याचं काही नाही. बाहेर फेकलेला सगळा स्पंज माझ्या पायाशी आणून फेकून दिला. बोला आता कसं अजून ओरडू… हसायलाच यायला लागलं मला… तिला ना मी एक स्पेसिफिक शिट्टी शिकवली होती. ती फक्त मीच वाजवायचे आणि ती वाजली रे वाजली की कुवू असेल निघून धावत माझ्याकडे यायची. 12 वर्षांची असताना तिला टय़ुमर डिटेक्ट झाला आणि वुई हॅड टू पुट हर टू स्लीप… नको विचारूस मला किती त्रास झाला ते…

त्यानंतर अनेक दिवस, अनेक महिने मी ती शिट्टी वाजवलीच नाही… आणि मला वाजवायचीच नव्हती. नवीन कुठलीच अटॅचमेंट नको होती… पण बघ ना नशीबात होतंच अजून एक बेबी. ऍडॉप्टच्या एका ग्रुपवर 2 महिन्याच्या परीचा फोटो आला. रिषिका आणि मानवच्या हट्टापायी… ‘मी त्याचं काहीही करणार नाही’च्या बोलीवर आम्ही त्या बाळाला घरी घेऊन आलो… संपलं ना.. अटॅचमेंट तर झालीच ना कितीही अलिप्त रहायचं म्हटलं तरी… परीसारखी आली म्हणून मी तिला परी म्हणते. माझी लॅबरेडॉर. मुलं मात्र ‘बोनी’ म्हणतात. ती आली आणि काहीच दिवसात मला बिग बॉसचं बोलावणं आलं. परत आले तेव्हा 6 महिन्याचं झालं होतं गं बेबी… असंच एक दिवस नकळत मी तीच शिट्टी वाजवली तर भु भूची साद घालत परी धावत माझ्याकडे आली. अंगावर असा शहारा आला गं… वाटलं माझी कुवूच परीच्या पावलांनी आलीये परत… नकळत डोळे भरले आणि घट्ट मिठीत परी सामावली.

अरे हो, आमच्याकडे 14 मांजरी आहे. 14… चार्ली नावाचं पर्शिअन मी रिषिकाला गिफ्ट दिलं होतं. व्हिस्की मला रस्त्यावर सापडला… 2 वेळा गाडीखाली येता येता वाचला… आणि मग घरीच आला तो माझा बडी आहे आणि माझी रूम त्याचीच टेरीटरी…  2 मांजरी एली आणि कॅली आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो तिथून ऍडॉप्ट केल्या… आणि बाकीच्या त्यांची मुलं… हॅरी, रॉन, डुबी, एलीएट, लिसा, जिम, जॅक, ह्युना, चुबुली (मी प्रेमाने बोलावते तिला) माया होती पण… गेली आता… सो त्यांची ही जी पिल्लं आहेत ना पर्शिअन आणि गावठीचं गोड मिक्स्चर आहेत. अग 3-4 डिलिव्हरी केल्यात मी त्यांच्या.

सध्या आमचं घर पुन्हा एकदा माणसं कमी आणि पेटस् जास्त पूर्व परिस्थितीत आलंय. पॉमची ताई, कुवूची आई आणि परीची अतिलाड करून बिघडवणारी आज्जी असा सगळा प्रवास झालाय माझा.. पण राहून राहून कुवूची आठवण येतेच… मानवला पावसात शाळेत सोडायला गेले होते. चुकून मागची काच उघडी राहिली… कुवू उडी मारून समोर चिखलात फूटबॉल खेळणाऱया मुलांत जाऊन रमली.. माखली… त्या माखलेल्या पिल्लाला आंघोळ घालताना… तेव्हा खूप ओरडले होते तिला, पण आज तुझ्याशी बोलताना ही आठवण आल्यावर वाटतंय… शी उगाच ओरडले माझ्या सोन्याला… नसताना… असतानाचे असे क्षण नसण्याचं दुःख कधीकधी अजून जड करतात… पण त्यांच्यामुळेच मी कध्धीच कधीच एकटी नसणारे… माझ्या या आठवणींच्या हिंदोळ्यावरच्या नसलेल्या आणि प्रत्यक्ष आजुबाजूला असलेल्या या पिल्लांमुळे माझं आयुष्य नेहमीच भरलेल्या घडय़ासारखेच असणारे..