दोघी…

अदिती सारंगधर,adsarangdhar@gmail.com

ब्युटीफुल आणि चेरी… एक मोठी… एक छोटी… दोघींना एकमेकींशिवाय जराही करमत नाही… ‘दोघीं’ची गोष्ट…

माझी कॉलेजमधली सीनियर, माझ्या अनेक मैत्रिणींची मैत्रीण, स्मिताताईंची सून, एक सुंदर अभिनेत्री टिया आणि आर्यची आई, सातमजली आणि निखळ हसणारी अशी सुलेखा तळवलकर मला माहीत होती… पण अस्मिता चित्रची एक मालिका करताना छान मैत्री जमली. अगदी रोज भेटलो नाही तरी ती टिकून राहिली… आणि भेटूया गं… भेटूया ना… असं करत इतकी वर्षे गेली… निमित्त जिवलगचं!

‘संध्याकाळी येणारेस तर काय खाणारेस?’ अत्यंत प्रेमानं आणि आवडीनं पाहुणचार करणं स्वभावतःच… गेल्यावर उत्साही हसण्याने दरवाजा उघडला तर समोर सोफ्यावर बसलेली ब्युटी (ब्युटीफूल) दिसली. खरं तर घरात असणाऱया पेट स्पेशीयली लॅब्राडोरने धावत येऊन अंगावर उडय़ा मारून वेलकम किंवा ग्रीट करणं अपेक्षित असतं. पण आज ही ढिम्म हलली नाही… ‘तिचे पाय अगं खूप दुखताहेत… चालायला जायचा पण कंटाळा करतेय… दोन दिवस अशीच बसून असते…’ सुलेखा म्हणाली. आधी जाऊन दिला कुरवाळले… मसाज केला… मी भेटले तेव्हा डोळ्यात एक आनंद दिसला… छानसा मुका घेतला… नुकतीच अंघोळ केल्याने लुसलुशीत कोट जास्तच तुकतुकीत दिसत होता. मऊ… तिला कुरवाळतच बाजूच्या खुर्चीत बसले. ‘घे बाई तुझी डाएट कॉफी’ तेवढीच पिणार असं म्हटलं होतं तिला फोनवर… बाजूला सुलेखा येऊन बसली आणि इतका वेळ पायाशी घुटमळणाऱया दुसऱया पिल्लाला चेरूला चेरीला मांडीवर घेतलं… आणि तिच्यासाठी आणलेला क्यूट टीशर्ट अंगावर चढवला. दुलूदुलू कान हलवत चालणारं इवलंसं पिलू शित्झू… ब्युटीच्या जवळजवळ पाठीवर जाऊन बसलं. ‘अगं ए… दुखतायत ना पाय… जरा तिकडं बस की’ असा एक लुक ब्युटीनं दिला तशी चेरी उतरून समोरच्या कॉफी टेबलखाली जाऊन बसली.

कॉफीचे मग्स एकमेकींना हवेत भिडवत आमच्या गप्पा सुरू झाल्या. ‘मला सवय होती अगं कुत्रे घरात असण्याची… आवडही आणि प्रेमही… इथे लग्न होऊन आले तेव्हा पमा होती. पॉमेरियन. ती स्मिताताईंची होती… म्हणजे तिने ठरवलं होतं की या माझ्या मास्टर आहेत. हळूहळू तिच्याशी मैत्री झाली आणि मग माझा दुसऱया नंबरावर शिक्कामोर्तब झाला. अनेक वर्षे ती आमच्याबरोबर होती. पण वयामुळे ती गेली… स्मिताताईंचा आजार बळावला आणि त्यांनी सांगितलं, ‘आता घरात कुणालाही आणायचं नाही… अटॅचमेंट होते. करावं लागतं… आणि नाही झालं मनासारखं तर त्रास होतो.’ त्यामुळे पमानंतर कुणी आलं नाही. बरेच दिवस इथे आर्य आणि टिया माझी मुलं मोठी व्हायला लागली तसं त्यांनाही पेट हवं होतं घरात… अंबरला (माझ्या नवऱयाला पण) रिकामं… शांत शांत घराची सवय नव्हती… उलट घरी पेट आलं तर स्मिताताईंनाही बरंच वाटेल… अंबरला लॅब्राडोर फिमेलच हवी असा हट्ट होता. हो-नाही करता करता शेवटी ‘हो’ने विजय मिळवला आणि ब्युटीफूल घरी आलीच…

माझ्या मैत्रिणीला आम्ही सांगून ठेवलं होतं… रेश्मा सावंतला… की, मला ऍडॉप्ट करायचंय… आणि आला मला फोन… आहे एक फीमेल लॅब… पण तिचं हिप डिसलोकेशन आहे… त्यामुळे तिला पपीज नाही होऊ शकणार.. पण ज्या क्षणी तिला पाहिलं त्या क्षणी वाटलं ‘किती गोड…’ म्हणून मग ब्युटी घरात आली. सहा महिन्यांची सुंदर, ब्युटी… पण आली ती एकटी एकटी राहायची. कारण शोधलं तर लक्षात आलं की आधीचा तिचा ओनर दिवस दिवस तिला एकटं ठेवायचा. फार काही लक्ष नसायचं… त्यामुळे ती एकलकोंडी झाली. मग एका डॉग बिहेवियर थेरपिस्टने सांगितलं की तिला खूप प्रेम द्या… बोलत राहा सतत तिच्याशी… मग हळूहळू कोपऱयात एकटीच बसून राहणारी ब्युटी सोफ्याजवळ यायला लागली. पायात घुटमळायला लागली. बेडरूममध्ये झोपायला लागली आणि आता तर अंबर आणि माझ्यामध्येच… अदिती, प्रेमात खूप ताकद आहे. आम्ही कध्धीच आमच्या पेट्सवर ओरडलो नाही. चिडून बोललो नाही. फक्त शांतपणे प्रेमानं त्यांना समजावलं आणि एकलंय गं त्यांनी…’

कोपऱयात बसलेली चेरी हळूहळू उठून सुलेखाकडे आली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिचे पिरीयड्स सुरू होते. डायपर घालू का गं हिला… नाहीतर तुझे कपडे खराब होतील. काळजीपोटी आईनं (सुलेखाने) मला विचारलं. नको गं… म्हणत मी त्या इवल्याशा गोंडस चेरीला उचलून घेतलं आणि बसली मग मांडीवर… अगं लाजतेय ती खूप… चेरू काय गं… कपडे घातल्यावर नसतं काही असं लाजायचं’ खटय़ाळपणे सुलेखा तिला सांगत होती. तर ‘ही चेरी कशी आली घरी?’ ब्युटीला कुणीतरी कंपनी म्हणून आणायचं होतं. तिच्याच ब्रीडचा म्हणून एक मेल लॅब्राडोर आणला घरी. त्याआधी ब्युटीशी बोलून तिला सांगून ठेवलं होतं. कारण तिच्या होकाराशिवाय घरी आम्ही काहीच करत नाही… तर… तो आला २-३ महिन्यांचा… पण ब्युटी त्याच्या विरोधातच होती. त्याला चावायला जायची. तो आमच्याजवळ आलेलं आवडायचं नाही. झालं… तो पुन्हा त्याच्या जुन्या घरी… मग एक फिमेल लॅब आणली. पण ती होती हिच्यापेक्षा उंच… धिप्पाड. तीसुद्धा तिला नाही आवडली. मग डॉक्टरकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, छोट्टंसं ब्रीड आणा. टॉय डॉग. त्याला करेल ती ऍक्सेप्ट… झाली.

परत शोधाशोध… आणि छोटंच असेल तर मला शित्झूच हवं होतं. आणि ऍडॉप्टच करायचं होतं. ७-८ महिन्यांची ही तिचा ओनर घरी घेऊन आला. कारण ओनर अमेरिकेत शिफ्ट होत होता… पण आली ती अत्यंत रागीट अन् गुरगुरणारी… टेम्पर प्रॉब्लेम असणारी ही बया… बापरे… हात लावला की चावायला धावायची. चावायचीच… चिडचिड करायची… पण आली ना आता ती… आता या मुलीला सुधारण्याची जबाबदारी होती. कारण माझ्या मुलाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी चावली. ओठ बाहेर… सुदैवाने ब्युटीने तिला ऍक्सेप्ट केलं होतं… पण पुन्हा खूप प्रेमानं मनापासून सगळं केलं तिचं. आज ४ वर्षांची आहे. बदलली की नाही ही… वाटेल कुणाला ही तीच चेरी आहे… सुपर ऍग्रेसिव्ह चेरी… पुन्हा एकदा प्रेमानं रागावर विजयच मिळवला होता की… आणि जमलं ते इतक्कं जमलं की आम्ही चौघं बाहेर देशी गेलो होतो. दिलीप आमचा अत्यंत जुना माणूस… ब्युटीचा लाडका. घरी २४ तास तिच्याबरोबर राहणार होता. चेरीचा जुना मालक हिंदुस्थानात आला तर तो काही दिवस तिला घेऊन जातो. म्हणाला, आम्ही गेलो तर दिलीपचा दोन दिवसांनी फोन… ब्युटी काही खात नाहीये… बरं धाव्वत परत येऊ इतक्याही जवळ नव्हतो. चेरीकडे फोन केला कशीये विचारायला तर तिनंही काहीच खाल्लं नव्हतं. तस्संच तिला घरी घेऊन आला दिलीप… जणू भरतभेटच झाली दोघींची… दमेपर्यंत खेळल्या… पोटभर खाल्लं आणि घोडे बेचके झोपल्याचा फोटो जेव्हा बघितला तेव्हा जीव भांडय़ात पडला आमचा. साता समुद्रापार… बघ ना… आधी कोणालाही ऍक्सेप्ट न करणाऱया ब्युटीनं चेरीला आपलं मानलं तेव्हा जीवापाड मानलं… कित्ती लोभस प्रेम..’

आईस्क्रीम दिलं नं की चटकन उठून बसतील आणि पटाक्कन फस्त करतील बघ… रोज रोज व्हॅनिला आईस्क्रीम हवं असतं ब्युटीला. आणि एकीला हवं असतं म्हणून दुसरीला मिळतंच… आणि नाही दिलं तर हट्टानं फ्रिजपाशी जाऊन बसतात. बाकी नखरे नाहीयेत खाण्याचे… चिकन, राईस हेच स्टेपल फूड आहे. ते पेडग्री किंवा रॉयल कॅननकडे ढुंकूनही बघत नाहीत दोघी… फळं खातात. ट्रीट्स आवडतात. पण ब्युटीचा कोट मेंटेन करण्यासाठी आणि तिच्या फूड रिऍक्शन्स अवॉईड करण्यासाठी हे अरबट चटबट खाणं टाळतोच… तशा गुणीच आहेत पोरी… आमच्या पानशेतच्या बंगल्यावर नेलं की अशक्य मस्ती करतात स्वीमिंग पूलमध्ये… आपल्या बरोबरीने उडय़ा मारतात. बाहेर काहीतरी खाऊन येतात आणि ओकतात. ओरडलेलं त्यांना कळतच नाही. त्यामुळे काही फायदाच नसतो.

चेरी म्हणजे माझा जीव की प्राण आहे गं… हां… अगं एक प्रसंग सांगते, चेरी नं पाणी खूप कमी प्यायला लागली. तिच्या सू सू तून रक्त यायला लागलं. डॉक्टरकडे नेलं तर कारण काहीच सापडलं नाही. मग तिच्याशी कम्युनिकेट केलं तर तिनं सांगितलं, माझ्या पाण्याच्या बाऊलमध्ये केस पडलेले असतात. ते स्वच्छ ठेवा. मग लक्षात आलं आमचं ड्रेसिंग टेबल तिथेच आहे. केस विंचरताना चुकून पडत असेल. त्याकडे लक्ष गेलंच नाही… मग जेव्हा जाणीवपूर्वक ३-४ वेळा भांडं स्वच्छ करून पाणी द्यायला लागलो तसं तिने भरपूर पाणी प्यायला सुरुवात केली… हिनं… पण ही कुठे गायब… वर १८ व्या मजल्यावर जाऊन बसली असेल… अगं चढून जाता येतं पण उतरता नाही येत चेरीला… डांबरट गेली की वर बसून असते. मग आपण जाऊन कडेवर घेऊन यायचं… वर जायला दरवाजा उघडला तर लिफ्टजवळ ब्युटीची वाट बघत बसली होती. लिफ्ट वर आली तशी ब्युटी बाहेर आली… आणि तिच्याच चालीनं हळूहळू चालत चेरी पण आत येऊन बसली.

किती वेळा आपण अशी आपल्या लाडक्या व्यक्तीची  लिफ्टपाशी वाट बघत उभं राहिलाय? आपण खूप खुजे असल्यासारखं वाटलं मला… इतकं प्यूअर प्रेम करता यायला हवं… कितीही उद्योग केले… कितीही मस्ती केली, मी कितीही दमलेली असले तरी रात्री जेव्हा माझ्या डोक्याचा झोपाळा करून झोपणारी चेरी आणि दोन पायांच्या मध्ये बेड करून झोपणारी ब्युटी शांत विसावले ना की उद्याचा पेपर कितीही कठीण असला तरी सोप्पा होऊन जातो.

खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून… खूप दिवसांनी…