बाहुली गोजिरी…

अदिती सारंगधर,adsarangdhar@gmail.com

बेला… इसाबेला. ‘झी युवा’ वाहिनीची प्रोग्रॅमर राजश्री कदम हिची लाडाची लेक..

खरं तर राजश्री आणि माझी काही फार जुनी मैत्री नाही. एका ग्रुपवर अनेक दिवस एकत्र गप्पा मारून आमची फक्त छान ओळख झालीय. ‘ऐक ना राजश्रीताई… मी ना ‘जिवलग’ नावाचा कॉलम करतेय. त्यात तुझं आणि बेलाचं करूया ना रायटप’. ‘अगं नक्कीच… वा वा’ (टिपिकल राजश्री रिऍक्शन) असं म्हणून आज अखेर फोनवर का हाईना, दोघींच्या वेळा जुळल्या.

अरे हो, तुम्हाला अजून लक्षात आलं नसेल, आता राजश्री गोरे-कदम कोण? खरं तर अनेक मालिका, कथाबाह्य कार्यक्रम जे तुमच्यापर्यंत वेळेवर आणि सुसंगत पोहोचतात त्यामागची अत्यंत जबाबदार व्यक्ती. एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर असं अनेक वर्षे चॅनलचं बिरूद मिरवल्यानंतर ‘झी युवा’ची लीड प्रोग्रॅमर… बाप रे… ‘बेलाची मम्मा’ सांगायचं राहिलंच.

ही गोष्ट आहे आमच्या बेलाची. 25 मे 2016. केतकीने (मुलीने) मला फोन करून सांगितलं, ‘आई, लवकर घरी ये. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.’ विचारांचा भुंगा दिवसभर डोकंच सोडत नव्हता आणि घरी दार उघडल्यावर एक कापसाचा गोळा पळत पळत दाराशी आला. चाळीस दिवसांचा सोनेरी गोंडस लॅब… बेला! माझ्यासाठी खरंच इतका आनंदाचा क्षण होता की, अपेक्षा नसताना घडलेलं अनपेक्षित इतकं इतकं सुखावह असू शकतं. निरपेक्ष जीवाला आणि आम्हाला वेड लावणारं माझं चौथं अपत्य ‘बेला सुनील कदम’. अत्यंत आनंदानं आणि अत्यंत प्रेमाने बाळाला उचलून घेतलं. सशासारखं दिसणारं गोंडुलं, खूप दिवसांनी भुभूचं बाळ परत घरात आलं होतं. मुलं मोठी झाल्यावर बाळ खूप वर्षांनी आलं होतं, पण मी कामात, नवरा व्यापात, मुलं त्यांच्या त्यांच्या विश्वात. या पिलाला सांभाळणं, व्यवस्थित संगोपन करणं जमणारेय का? आमच्या आनंदासाठी आणि मुलांच्या उत्साहासाठी त्या चार दिवसांच्या बाळाची फरफट कशाला म्हणून तीन-चार दिवस ठेवून नंतर पुन्हा जिथून आणलं तिथे परत द्यायचं असं ठरलं. खरं तर खाऊसाठी मिळालेल्या पैशातले पैसे बाजूला साठवून मुलींनी हा सगळा घाट घातला होता. त्यामुळे या विचाराला शंभर टक्के ‘नो’ असं उत्तर मिळालं. 2चे 4, 4चे 40 आणि 40 दिवसांची अडीच वर्षे झाली. तो विचार दुसऱयाच क्षणाला मोडून काढण्यात मुलांना आलेले यश आज शंभर टक्के समाधान देऊन जातं.

सकाळी मला पूर्ण चाटून उठवणे ही बहुतेक तिची दिनचर्या असावी. चहाला बसले की, विशिष्ट बिस्किटासाठी पुढे येणारा हात तिची सवय आणि कामावर निघालं की, दारापर्यंत येऊन निरोप देणं तिचं निरपेक्ष प्रेम. बरं, सकाळी फक्त आणि फक्त मलाच उठवायचं, शेकहॅण्ड करायचं आणि जायचं. बाकी बाबा आणि भावंडांना अजिबातच डिस्टर्ब करायचं नाही. सोळाव्या मजल्यावरच्या खिडकीतून सकाळी बाहेर बघत तिच्याशी गप्पा मारायला खूपच मज्जा येते गं. भाषा कळो न कळो, स्पर्श आणि भावनांनी मजबूत बांधलेलं आमचं नातं आहे. बेला तशी अतिच हुशार. घरातल्या प्रत्येकाचं घरातलं स्थान, वजन आणि हट्ट पूर्ण करण्याची क्षमता तिला माहीत आहे. त्यामुळे बाबाच्या मांडीवर तो जेवताना फक्त डोकं ठेवलं तर ताटातली पोळी आपल्या तोंडापर्यंत येणारच, पण ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त मागितले तर हिटलर मम्मा काही अरबट चरबट देणार नाही आणि कितीही आळस केला, लपून बसलो तरी वजनाचा काटा गडबडून जाऊ नये म्हणून सोळा मजले दिवसातून एकदा वरखाली करायला लावणारा पार्थदादा, ‘छुप के छुप के’ एक्स्ट्रा लाड पुरवण्यासाठी केतकीला लावलेला मस्का. आईशप्पथ कसं काय कळतं देव जाणे! आमचे रुसवे फुगवे तर मोठमोठय़ा नटय़ांना पण जमणार नाही इतके. राग आला की, त्या व्यक्तीकडे कुले करून समोरचे दोन हात चेहऱयाखाली घेऊन निर्विकार मुद्रेत बसायचे. काण्या डोळ्यानं आता समजूत काढायला येतील, मग समजूत काढायला येतील म्हणून बघायचं आणि आपण जवळ आलो की, चटकन दूर जायचं. ‘अगं, कसलं गोड!’ मी म्हटलं, ‘मग तर मी रोज हिचा रुसवा काढायला येते.’

ठमा नुसती… खेळायला वगैरे बाईंना जामच आवडतं. त्यामुळे तिच्या वेगानं पकडापकडी घरभर सुरूच असते, पण दरवाजा उघडा दिसला की, क्षणात धावत बाहेर आणि 1500 मध्ये. तिथं आजकाल एक छोटू बिगल आलाय. तो आमच्या बेलाला जाम आवडतो. तिला एक खेळणंच मिळालंय. आधी लक्षात नाही आलं. पहिल्यांदा गेली तेव्हा त्यांचा घाबरून आरडाओरडा. एव्हाना त्यांना आणि बिगलला सवय झालीय. चाळीतली मुलं कशी एकदा गेली कुणाकडे की, खेळून जेवून येणार. तसंच ही बयो जेवूनबिवून येते कधी कधी. तशी काही माणसं तिची फेव्हरेट आहेत. ती आली की, उडय़ा मारून नुसता दंगा, पण तिला न आवडणारी (खरं तर न भाव देणारी) माणसं आली की, बघतही नाही. धोबी आला तर निघूनच जाते की गं!

तशी गुणी आहे हो आमची लेक. भाजीबिजी निवडून ठेवता येते. हसत हसत राजश्रीताई म्हणाली. ‘म्हणजे…’ मी विचारलं. ‘अगं, एकदा भाजी टेबलवर ठेवून गाडी नीट पार्क करायला म्हणून खाली गेले. 5 मिनिटांनी वर येऊन बघतेय तर कोथिंबिरीची जुडी गायब. सोफ्यामागे काडय़ा आणि पानं सगळं वेगळं करून रवंथ करत बसला होता चोर. लहान मुलांना आपण कसं शिकवतो ना, बाप्पा जय जय… तसं मी रेडी व्हायला घेतलं. अंघोळीहून आले की, माझ्या आधी बाप्पाकडे जाऊन बसलेली असते. ‘जय जय’ म्हटलं की, पुढच्या दोन पायांनी नमस्कार करते. हे सगळं शिकवून, सांगून नाही गं, आपणहून करून घेतलेले संस्कार आहेत.

बयोला फिरायला फारच आवडतं. आमच्याबरोबर खाली खेळतेच, पण गाडीची चावी घेतली, बॅग भरली, तिचा एक टॉवेल घेतला की, तिला कळतं कुठेतरी जायचंय. मग लिफ्ट उघडायचा अवकाश, ही धावत जाऊन शेपूट हलवत गाडीपाशी बसते. पुण्याला तिला बऱयाचदा घेऊन जातो आम्ही आजीच्या घरी. घराजवळचा परिसर ओळखते आणि जवळ आली की, काचेवर पंजे मारायला लागते. दरवाजा उघडला की, वाऱयाच्या वेगाने जाऊन आधी आजीच्या मिठीत हे भलंमोठं लेकरू. वर गच्चीवर आजीनं लावलेल्या बागेतल्या कुंडय़ांमधून माती काढणे, पोटबिट बरं असलं तरी तुळस खाणे हा असला आगाऊपणा करते.

मला झाला होता डेंग्यू. झोपून पडून राहणारी आई तिनं कधीच बघितली नव्हती. तिला ते इतकं विचित्र वाटत होतं. यायची आणि तिचं गार गार नाक माझ्या गालाला दर दहा मिनिटांनी लावून जायची. जणू मी बरी आहे का बघून जायची. मला इतकं ते मनाला स्पर्शून गेलं… बोलता येत नाही, पण माझी सगळ्यात जास्त काळजी न बोलता तिनंच घेतली. मला बुस्ट केलं. गोळी घ्यायला उठले तरी मागेमागेच फिरायची. मुलंही एका पॉइंटनंतर बिझी होतात आपापल्या विश्वात, पण माझ्या बेलानं माझ्यासाठी विश्व निर्माण केलं. असंच संपूर्ण घरात एकदा खूप तणावाचं वातावरण होतं. मी आणि सुनीलना रडताना बघून ती बिथरली. कावरीबावरी झाली. पायात घुटमळायला लागली. येऊन अंगावर नुसत्या उडय़ा मारत होती. गोल गोल फिरत होती. जणू सांगायचा प्रयत्न करत होती की, प्लीज बॅकअप… बाहेर या आता. खेळा माझ्याशी. बोला माझ्याशी. बरं वाटेल तुम्हाला. काय करावं गं या बाळाचं?

एकदा आमचं हे बाळ खूप आजारी पडलं होतं तेव्हा घराचं अक्षरशः भिरभिरं झालं होतं. सुट्टी म्हणून सगळे गोव्याला गेलो होतो. बेलाला एका डॉग हॉस्टेलमध्ये ठेवून परत आलो तर आम्हाला बघून खूश झाली, पण विचित्रच वागत होती नंतर ती. संपूर्ण तीन दिवस तिला बांधून ठेवलं होतं. असा राग आला ना घरी आल्यावर. खूप ताप चढला. टिक फिवर. मग सलाईन, औषध, इंजेक्शन्स, नको गं. बोलायला पण नको त्या प्रसंगाविषयी. त्या आजारपणातच फळांची आवड आणि चव लागली बाईंना. आता तर काय फळं, पालेभाज्या, चिकन, राईस, डॉग फूड, सगळं सगळं खाते. गोड पण खाते, पण आम्ही म्हणजे मीच जरा टाळते. आठवडय़ातून चारवेळा चिकन, गाजर, टोमॅटो, बटाटय़ाचं सूप तिला देते. अत्यंत पौष्टिक सूप. बघितलं वास आला की, असेल तिथून धावत येऊन क्षणात फडशा पाडते. खरं तर तिचं पूर्वीचं नाव इसाबेला. इंग्रजाळलेलं… काही केल्या आपलं वाटत नव्हतं. त्याचं आम्ही बेला केलं. किती जवळचं, आपलं वाटतं ना बेला! घरातलं कुणीतरी…

बेला

दोन लबाड डोळ्यांची

जशी बाहुली गोजिरी

चार मऊ पावलांची

परी आली माझे घरी

 

झोपायला हवी गादी

अन् उशी माझा हात

न्याहारीला ऊन दूध

जेवणाला मऊ भात

 

कधी मारीतसे पंजे

आणि कधी घेई चावे

तरी जो-तो घरातला

तिच्या दिमतीला धावे

 

दिसभर मागे-पुढे

नाचे इवल्या पाऊली

माझ्या लेकरांची माय

झाली तिची ही माऊली

 

काम हातचे सोडून

सुरू झाली तिची सेवा

कधी वाटे आपुलकी

आणि कधी वाटे हेवा

 

केले आपलेसे मला

डोळे घालूनी डोळ्यात

आणि बायकोशेजारी

केले घर काळजात

 

तिचे नशीब म्हणावे

की, माझी ही पुण्याई?

माझी लेक होऊनिया

माझ्या घरामध्ये येई‘!

  • नील