जिवलग-बळवंतराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर  [email protected]

बळवंतराव…. आतिषा नाईकचे लाडके चिरंजीव… दोघंही मायलेक एकमेकांची सारखीच काळजी घेतात….

‘बापरे… हा तर डेंजर डॉग आहे. घरात ठेवणार?’

‘अरे तो ऍग्रेसिव्ह आहे. हल्ला केला तर जीव जाईल.’

‘अलाऊड आहे का रॉटव्हिलर घरात ठेवणं?’

‘वा… तुझ्याकडे रॉटव्हिलर आहे?’

अशा अनेक प्रतिक्रिया…

आणि ‘बाई… गं त्याला फक्त तूच सांभाळू शकतेस आणि तुला तो?’ अशी खात्री… फोटोत बघून लक्षात आलं असेलच. तुमच्या प्राण्यांवर, विशेषतः डॉग्सवर अत्यंत प्रेम करणारी, त्यांचे लाड पुरवणारी, त्यांची काळजी घेणारी, त्यांची ममा आतिषा नाईक.

अनेक खाष्ट भूमिकांमधून ती पडद्यावर दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र गणित शंभर टक्के उलट आहे. खूप मजा आणि खूप गप्पा मारायला आवडतात हिला. सो असंच ओघात जिवलगविषयी बोलले आणि येस… हो… ओके… डन! तर आमचे बळवंतराव 45 दिवसांचे होते तेव्हा ते आमच्या घरी आले. सुरुवातीला क्यूट, गोंडस, छोटंसं दिसणारं हे बबडू झपझप मोठं झालं गं… खूप खूप पटकन… घरी आला तसा जरा इकडे तिकडे केलं आणि दोन-चार दिवसांत त्याला कळलं की फायनली ही बाई आपली ‘आई’ असणारय. हिला आई म्हणणारी दुसरी आपली ‘ताई’ असणार आहे. पण आठव्या दिवशी आमचं पिल्लू पडलं जरा आजारी… उलटय़ा व्हायला लागल्या. कुशीत घेऊन झोपले त्याला. पण त्याला हवी असणारी मायेची ऊब नाही देता आली तेव्हा… आईपासून त्या पिल्लाला वेगळं केल्याचा त्रास झाला त्याक्षणी… पण त्यानंतर आज आमचं इतकं बॉण्डिंग आहे की, बहुतेक स्पर्धेत भाग घेतला तर मीच बेस्ट मॉम आहे असं तो सांगणार… (जोक्स अपार्ट). पण घरी आल्यावर त्याने अंगावर उडी मारली नाही आणि मी जोरात ‘बळवंतराव’ म्हटलं नाही तर… दिवस संपला असं वाटत नाही.

तो घरी आला तेव्हा माझं रोज शूटिंग सुरू होतं. सो, मी रोज त्याला सेटवर घेऊन जायचे. तिकडच्या कुत्र्यांशी त्याची मैत्री झाली. आर्टिस्टशी गट्टी जमली. सो, सकाळी उठताच शी-शू करायची, नाश्ता करायचा आणि गाडीत बसून ऐटीत शूटिंगला जायचं हे त्याचं रूटीन झालं होतं. खूप लोकांमध्ये खूप सुरुवातीपासून त्याची इंटरॅक्शन असल्याने तो खूप माणसाळला… त्यामुळेच कधी तो कुणाच्या अंगावर धावून गेला नाही की त्याने कुणावर हल्ला केला नाही. ना कुणाला चावला… पण… सेटवर वेळोवेळी विचित्र सरप्राईजेस देऊन आपण रॉट व्हिलर आहोत याची जाणीव करून देत राहिला.

गंमत सांगते, आमच्या शूटिंगच्या वॉचमनच्या खोलीत एक कोंबडी राहायची. याने बहुतेक बरोबर लक्ष ठेवलं होतं तिच्यावर… आणि गटारीच्या आदल्या दिवशी त्याने तिला पकडलं आणि पळवली… आणि घेऊन आला माझ्याकडे.. गटारी करायला. आईशप्पथ… तोंडातून बाहेर काढलं तेव्हा एवढंही लागलं नव्हतं गं तिला… नाही तर? तिला मी दिली सोडून तर हा विचित्र वागायला लागला… हाक मारली तर रिऍक्ट होईना… नीट ऐकेना… तोंड बिंड धुतलं… घरी निघालो… गाडीत हूं की चू नाही… मध्ये पण शांतच… मला कळेच ना काय झालंय काय या पठ्ठय़ाला… रात्री टय़ुब पेटली. बहुतेक कोंबडी प्रकरण असावं… तर खरंच की. त्यावरून समजूत घातली. सॉरी म्हटलं. शंभर वेळा… तेव्हा कुठं फुरंगटलेला चेहरा नीट झाला. त्याने प्रेमाने आणलेलं गिफ्ट मी घेतलं नाही याचा राग आला होता त्याला. तसं आम्हाला बऱयाच गोष्टींचा राग येतो. सिग्नलला गाडी थांबली की येतो, आवडतं जेवण दिलं नाही की येतो, ममाला कुणी माझी ममा म्हटलं की येतो, पण गरीब आहे गं माझं पोरगं… सगळं ऐकतो. त्याने मला ऍडजस्ट केलंय. सगळय़ाच बाबतीत.

सगळय़ा चांगल्या सवयी आहेत आमच्या मुलाला. बाहेरून आल्यावर छान हात, पाय, तोंड धुतो. पुसतो. आणि आपण नाही पुसले तर सरळ येऊन कपडय़ांना पुसतो. व्यवस्थित ट्रेण्ड असल्याने शी-शू टॉयलेटमध्येच करतो… आणि ते क्लीन केल्याशिवाय तो आपला पिच्छा सोडत नाही.

जनरली साहेब सकाळी 7 वाजता ट्रेनरबरोबर वॉकला जातात. आजूबाजूचे सगळे कुत्रे क्षुद्र आहेत अशा थाटात इकडे तिकडे बघत मस्त फेरफटका मारतात, घरी येतात… पोटोबा फुल्ल करतात आणि चक्क घोरायला लागतात… दिवसभर मी भेटत नाही. मग संध्याकाळी/रात्री मी आल्यावर मला सोडतच नाहीत… आणि मी पण रात्री कितीही उशीर झाला तरी त्याला खाली फिरायला घेऊन जातेच… नाही गेले तर हट्ट करतो गं लहान बाळासारखा… बाळच आहे! मला पण त्याच्याबरोबर घालवलेला तो वेळ अक्षरशः रिफ्रेशिंग वाटतो. उद्यासाठीचं एनर्जी देणारा…

अगं हो… एक डेंजर किस्सा सांगते. फायनली मध्ये शूटिंग होतं. आमच्या बाजूलाच एका ऐतिहासिक सीरियलचं शूटिंग सुरू होतं… मी आपलं नेहमीसारखं त्याला वॉकला घेऊन गेले. समोर घोडा बघून काय वाटलं कोण जाणे. धावला ना गं हा… वाऱयाच्या वेगानं… त्या घोडय़ाचं शेपूट पकडायला. बापरे… माझी अशी वाट लागली. तो घोडाही पळाला. घोडय़ाचा वेग कुठे साधता येतोय. बळवंतराजे दमले थोडय़ा वेळानं… आणि आले माझ्याकडे. तोवर मी गॅसवर… असाच बैलाच्या मागेही धावला होता… शेपूट पकडायला! उद्योगी बाळ… पण हे बाळ तितकंच गुणी आहे गं. तीन महिने घरात काम सुरू होतं. त्याला इतकं ऍडजस्ट केलं… किरकीर, चिडचिड, पिरपिर काही नाही. उलट कामगार आले की रोज त्यांना रिसीव्ह करायला दरवाजात… सगळे हजर असतील तर सरळ घरात यायचा. पण एक जरी आला नसला तरी तिथेच ताटकळत उभा राहायचा… काही वेळाने तो लेटलतीफ आला की साहेब घरात… हे काय? का? काही कळलं नाही बुवा.

अत्यंत औत्सुक्य असतं रावांना सगळय़ा गोष्टींचं… हॅण्डवॉशचं, पॅकेट फोडलं तर का? पडदे धुवायला कशासाठी काढले? आज फिश का आणलंय? रिमोट घेऊन नक्की कुठलं चॅनल लावलं जाणार आहे? घरी येणारी माणसं कोण आहेत? का आली आहेत? साधारण किती वेळ बसणार आहेत? मेटल डिटेक्टर किंवा फ्रिस्कीईंग मशीनमधून कसं सगळं गाळून पुढे जातं? एक्झॅटली बळवंतराव ते करत असतो रोज. सतत… आमचा जुदाईमधला परेश रावल.

पण तितकाच हळवा आहे गं… माझी मुलगी परदेशात गेली होती आणि बहुतेक नेटवर्क… वेळा… यामुळे काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. दोन दिवस माझे टेक्स्ट डिलिव्हरच होत नव्हते. एक ‘आई’ म्हणून माझ्या जिवाची होणारी घालमेल जाणवत होती त्याला… येऊन सतत घुटमळत होता पायात. गालावर पंजाने समजावत होता… आणि एक क्षण माझा बांध फुटला. डोळय़ांतून घळाघळा पाणी आणि भिरभिरलेल्या मला त्याने इतकं समजून घेतलं, समजावलं, आधार दिला हे सांगून समजण्यापलीकडचं आहे. काही न खाता पिता तो बाजूला बसून होता तिचा फोन येईपर्यंत. कारण माझ्याइतकीच त्याचाही ती जीव की प्राण… घरात असल्यावर अक्षरशः तो तिचं शेपूट असतो. तिच्याच बाजूला बसणार… झोपणार… तिलाच जाऊन उठवणार… अतोनात प्रेम आणि लाड करणार… अदिती, असं रिलेशन नाही गं बघायला मिळत माणसामाणसात… निरपेक्ष… भरभरून देता येईल असं सगळं उधळून टाकणारं निर्व्याज प्रेम.

अशीच माझी मैत्री झालेले अनेक जण आहेत. बंडय़ा, बबली, मंजुळा… फोटोत आहे बघ ना… शूटिंगला यायला सुरू झालं इथे तर हा बिलकुल केस नसणारा… विस्कटलेला बंडय़ा समोर आला. हळूहळू त्याची मी काळजी घ्यायला लागले. व्यवस्थित डॉग फूड आणायला लागले. तिथं असणाऱयांना शॅम्पू देऊन छान आंघोळ घालून न्यायला लागले. थोडय़ा फार कमांड्स द्यायला लागले. आधी जेवणापासून आम्ही लांब गेल्यावर जेवणारा बंडय़ा आता चक्क माझं शूट सुरू असताना धावत अंगावर दोन पाय ठेवून उभा राहातो आणि कॅमेऱयात माझा शॉट सुरूच असतो. आता त्याची त्यालाही सवय झाली आहे. मलाही आणि सेटवरच्या लोकांनाही…

तशीच ही बया मंजुळा आली… हडकं पिल्लू… आता खाऊन पिऊन जरा तरतरीत झाली आहे. बंडय़ा आणि मंजुळाची गट्टी झाली असली तरी मंजुळा फारच शिस्तप्रिय आहे. शॉट सुरू असताना उगाच उडाणटप्पूगिरी करणार नाही. न सांडवता व्यवस्थित जेवणार, उगाच भुंकत बसणार नाही वगैरे… आणि तशीच एक दिवस आली बबली. पण तिच्याशी काही अजून तितकी मैत्री नाही झालीय… एकटीच असते. जरा लाजाळू आहे. बंडय़ा आणि मंजुळाला ही अजिबात आवडत नाही… त्यामुळे जरा जपूनच असते. पण त्या तिघांमुळे माझं सेटवरचं घरही भरल्यासारखं वाटतं. पण त्यांच्याशी खेळून गेल्यावर आमचे घरचे रावसाहेब मात्र चिडतात. मग तो राग काढायला चिकन राईस वगैरे काही नाही काम करत…

‘चला बळवंतराव’ म्हटलं की त्याचा खुलणारा चेहरा बघितला की वाटतं आयुष्य सुंदर आहे… आयुष्यात जगणं आहे. थँक्यू बळवंत… थँक्यू आतिषा…