
ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि श्री समर्थ सेवक मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या लीला श्रोत्री यांचा शतक महोत्सवी गौरव सोहळा हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या तीन पिढ्या घडवणाऱ्या लाडक्या श्रोत्रीबाईंचे विद्यार्थ्यांनी औक्षण केले आणि ग्रंथतुला व धान्यतुला करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
लीला श्रोत्री यांनी शिवसमर्थ विद्यालयात शिकवताना विद्यार्थ्यांना अभ्यास सोप्या पद्धतीने शिकवला, समजवला. त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होत्या. 22 वर्षांच्या सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या. मात्र त्यानंतरही आजतागायत त्या शाळेच्या बाह्य परीक्षा, विविध उपक्रम, संस्कृत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांना मदत याद्वारे अद्यापही कार्यरत आहेत. 2 एप्रिल रोजी त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. वयाच्या शतक महोत्सवी वर्षातही सक्रिय असणाऱ्या प्रेरणादायी ऋषितुल्य व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी श्री समर्थ सेवक मंडळाने त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा देखणा सोहळा आयोजित केला होता.
श्री समर्थ सेवक मंडळातर्फे त्यांची धान्यतुला करण्यात आली तर माजी विद्यार्थी व हितचिंतकांनी श्रोत्रीबाईंची ग्रंथतुला केली. यातील धान्य आणि पुस्तके आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. मंडळाचे शास्ता डॉ. चैतन्य साठे आणि कार्यकारी विश्वस्त जयेश सोहनी यांनी त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी विश्वस्त उल्हास प्रधान, प्रफुल्ल प्रधान, मुख्याध्यापिका वर्षा ओक, श्रोत्रीबाईंची कन्या अंजली सुळे, पणतू स्मित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाईंचे विद्यार्थी शरद राईलकर, अतुल दोंदे, आनंद शिंदे, मीनल माहीमकर-सातघरे यांनी आठवणींना उजाळा दिला. शैला भाटवडेकर व पौर्णिमा जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर स्मिता जोशी यांनी आभार मानले.

























































