शाहीर साबळे यांना शतकोत्तर जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त त्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी ‘संकल्प कला स्पर्श सोहळा 2025’ चे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार, राजकीय नेते, शाहीर अशी सर्व क्षेत्रातील मंडळी सहभागी होणार आहेत. 3 सप्टेंबर रोजी वाई तालुक्यातील एसर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान आणि संकल्प न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया या सोहळ्यात लोककलेवर आधारित विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाहिरी, गायन, नृत्य आदी लोककलेचे प्रकार सादर होत असून त्या त्या कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपली कला सादर करणार आहेत. लोक साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी शब्दबद्ध केलेले पद्मश्री शाहीर साबळे यांचे आत्मचरित्रही या सोहळ्यात प्रकाशित केले जाणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील आणि ज्यांनी राज्याला महाराष्ट्र गीत दिले त्या शाहीर साबळे यांना मानवंदना देतील, अशी माहिती पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम यांनी दिली.