एखादा जवान शहीद झाला तर त्याच्या नावाने मिळणारी पेन्शन कुणाला मिळणार असा सवाल लोकसभेत विचारला गेला. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. शहीद जवानाची पेन्शन पत्नी आणि आई वडिलांना समसमान वाटण्याचा विचार करत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी लोकसभेत यावर उत्तर दिले आहे. सेठ म्हणाले की पत्नी आणि आई,वडिल यांच्यात पेन्शन वाटण्याचा प्रस्ताव मिळाला आहे, यावर सरकार विचार करत आहे.
सैन्याकडून प्रस्ताव
आर्थिक मदतीसाठीच्या कायद्यात बदल करावेत अशी मागणी शहीद सैनिकांच्या आई वडिलांकडून केली जात आहे. सैन्याने असा प्रस्ताव दिल्याचे संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी सांगितले
नियमांनुसार शहीद जवानांची ग्रॅच्युएटी, प्रोव्हिडंट फंड, विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जवानांनी ठरवलेल्या वारसांना जाते. पण कोणी जवान विवाहित असेल तर पेन्शनची रक्कम शहिद पत्नीला मिळते. आणि जर जवान अविवाहित असेल तर आई वडिलांनी पेन्शन दिली जाते.
गेल्या काही वर्षात सैन्याकडे पेन्शनसंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यात शहीद जवानाच्या पत्नीला पेन्शन मिळते आणि जवानाचे आई वडिलांना कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. इतकंच नाही तर शहीद जवानाच्या पत्नीसोबत चुकीची वागणूक, घराबाहेर काढण्याची धमकी आणि दुसरे लग्न करण्याची जबरदस्ती केली जायचीय त्यामुळे पेन्शनवर कुणाचा हक्क असावा असा प्रश्न समोर आला होता.