दिवाळीत स्वस्ताईचा वायदा, जीएसटी घटवणार

महागाईने उच्चांक गाठला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता यंदाच्या दिवाळीत स्वस्ताईचा वायदा केला आहे. दिवाळीत जीएसटी कमी करून देशवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा मोदी यांनी आज केली. आम्ही सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आता पुढच्या पिढीच्या जीएसटीवर आम्ही काम करत आहोत. या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या तसेच दैनंदिन वापरातील वस्तू खूप स्वस्त होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

पुढच्या पिढीसाठी जीएसटीची पुनर्रचना करणे ही काळाची मागणी आहे, असे सांगतानाच, आम्ही यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यांनी याबाबातचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येत आहोत. येत्या दिवाळीच्या आत देशवासीयांना दिवाळीचे गिफ्ट मिळेल, असेही ते म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंवरचे कर मोठय़ा प्रमाणावर कमी करणार आहोत. जीएसटीत घट झाल्यामुळे लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असेही मोदी म्हणाले.

नेमकी कशी असेल कररचना?

जीएसटी कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. या बदलांमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून तंबाखू आणि इतर काही वस्तूंवरील जीएसटी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत 5 टक्के आणि 18 टक्के कर श्रेणीतील 90 टक्के करपात्र वस्तू सुधारित करप्रणालीत 18 टक्क्यांच्या श्रेणीत येण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव जीएसटी परिषदेकडे पाठवण्यात आला असून सप्टेंबर महिन्यात या बदलांना अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन दिवसांची बैठक होण्याची शक्यता आहे.

दैनंदिन वापराच्या उत्पादनांवर 5 टक्के कर

सुधारित जीएसटी कर प्रणालीत सामान्यांच्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांवर 5 टक्के कर आकारला जाण्याची शक्यता आहे, तर चैनीच्या वस्तूंवर तसेच तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या आरोग्यासाठी हानिकारक पदार्थांवर 40 टक्के कर आकारला जाण्याची शक्यता आहे.