दक्षिण मुंबईतील लोकल प्रवासी उपनगरात सरकले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा ठाण्यापलीकडील प्रवास धोकादायक बनत चालला आहे. 12 डब्यांच्या लोकलमध्येही गर्दी सामावण्यापलीकडे गेली आहे. प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना दक्षिण मुंबईतील लोकसंख्या आश्चर्यकारकपणे कमीकमी होत जाऊन ती पूर्व उपनगरात सरकत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या सर्वात मोठय़ा रेल्वे स्थानकाची सरासरी दैनंदिन प्रवाशांची आश्चर्यकारकपणे कमी झाली आहे.

ब्रिटिशांनी 100-150 वर्षांचा विचार करून बांधलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात एरव्ही पिकअवरमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते. तुम्ही जर तरबेज नसाल तर येथे सायंकाळच्या गर्दीत तुमची निदान चार-पाच जणांशी धडक होते. अशी परिस्थिती असताना मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार मात्र सीएसएमटीची लोकसंख्या गेल्या सहा-सात वर्षांत सातत्याने कमी होत आहे अशी आश्चर्यकारक बाब उघडकीस आली आहे.

या हेरिटेज दर्जाच्या रेल्वे स्थानकात सात प्लॅटफॉर्म असून लांब पल्ल्याचे धरून एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत. 2012-13 साली सीएसएमटीची दररोजची सरासरी प्रवासी संख्या दोन लाख एक हजार 817 होती. 2013-14 रोजी ती एक लाख 96 हजार 617 झाली, तर 2014-15 मध्ये एक लाख 88 हजार 649 इतकी झाली. पुढे अनुक्रमे 2015-16 (1,66,987), 2016-17 (1,66,268), 2017-18 (1,54,597) आणि 2018-19 मध्ये ती (2,08,523) इतकी झाली आहे.

भांडुप, विक्रोळी, दादर, भायखळा, मस्जिद, सीवूड, शहाड, विठ्ठलवाडी, करीरोड, चिंचपोकळी अशा गर्दीच्या रेल्वे स्थानकांची दररोज सरासरी प्रवासी संख्या दिवसेंदिवस आश्चर्यकारकपणे कमी होत चालली असल्याचे मध्य रेल्वेच्या सन 2018 मार्च ते 2019 एप्रिल या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

गर्दीच्या या स्थानकावरील प्रवासी नवी मुंबईच्या दिशेने पनवेलपर्यंत तसेच बीकेसी येथे अनेक कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या वाढू लागल्याने प्रवासी संख्या कमी होत आहे. डीआरयूसीसीच्या मीटिंगमध्ये कुर्ला ते पुढे जादा फेऱ्या चालवाव्यात अशी मागणी केली आहे. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

स्थानके / साल / 2013-14 / 2017-18
सीएसएमटी – 1,96,617 – 1,54,597
भांडुप – 1,00,529 – 1,07,074
दादर – 76,153 – 76,885
मस्जिद – 56,745 – 52,993
करी रोड – 38,851 – 36,776
चिंचपोकळी – 38,569 – 36,274