
मध्य रेल्वेची नाशिकमार्गे धावणारी राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चार वेळा धावणार आहे. यापूर्वी ही गाडी बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातून दोन वेळा धावायची. नुकतेच या गाडीला डबल इंजिन लावून तिच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. आता आठवड्यातून चार वेळा ही गाडी धावणार असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेवर 27 वर्षांनी सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन अशी पहिली राजधानी जानेवारीपासून सुरू करण्यात आली. ही राजधानी महाराष्ट्रातून जात असल्याने मुंबईतीलच नव्हे तर नाशिक, जळगाव आणि भोपाळमधील प्रवाशांना फायदा झाला आहे. त्यानंतर राजधानीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत होती, मात्र मध्य रेल्वेकडे एक गाडी असल्यामुळे एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढविता येत नव्हत्या. मात्र पश्चिम रेल्वेने त्यांच्याकडे अतिरिक्त असलेला 20 डब्यांचा रेक मध्य रेल्वेला दिल्याने आता मध्य रेल्वेची राजधानी आठवड्यातून चार वेळा धावणे शक्य होणार आहे.


























































