
प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन 13 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या 24 विशेष फेऱया चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सावंतवाडी, नागपूर आणि कोल्हापूरसाठी जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कोल्हापूरदरम्यान 6 विशेष फेऱया चालवण्यात येणार आहेत.
महसूल विभागात जमिनीची 12 हजार प्रकरणे प्रलंबित
राज्यातल्या जमिनीशी संबंधित सुमारे 12 हजार प्रकरणे मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. अनेकदा केवळ नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेतच अनेक महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे आता पक्षकारांना ईमेलद्वारे कायदेशीर नोटीस देण्यात येणार आहे. राज्यातील जमीन महसूल सुनावणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता तसेच प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलमांत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे (ई मेल) नोटीस बजावणे कायदेशीर ठरवण्यात आले आहे.
करण जोहरला कोर्टाचा दिलासा
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरबाबत कोणतेही आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करू नका, असे आदेश दिवाणी न्यायालयाने यूटय़ूबर अजेय नागरला दिले आहेत. नागरने बदनामीकारक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले. याचा नाहक त्रास होत आहे. हे व्हिडीओ तातडीने डिलीट करण्याचे आदेश न्यायालयाने नागरला द्यावेत, अशी मागणी करणारा दावा करण जोहरने केला होता. सत्र व दिवाणी न्यायाधीश पांडुरंग भोसले यांच्यासमोर या दाव्यावर सुनावणी झाली. नागरच्या व्हिडीओमुळे करण जोहर यांची बदनामी झाल्याचे तूर्त स्पष्ट होत आहे, असे नमूद करत न्यायालयाने वरील आदेश दिले.

























































