केंद्राने मनात आणले तर पेट्रोल, डिझेल 50 ते 60 रुपयांना मिळू शकेल, संजय राऊत यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

केंद्र सरकारने मनात आणले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 50 किंवा 60 रुपयांपर्यंत स्थिर राहू शकतील, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

केंद्र सरकारने फक्त अडीच रुपये कमी केल्याने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळालेला नाही असे स्पष्ट करत राऊत म्हणाले, आजच्या दर कपातीला मी दिलासा म्हणू शकत नाही. केंद्राने अडीच रुपये कमी केल्यानंतर महाराष्ट्र राज्याने अडीच रुपये कमी केले. आधी सगळे रक्त दरवाढ करून शोषून घेतले. जेव्हा महाराष्ट्रातील जनता व्हेंटीलेटरवर गेली त्यावेळी थोडा थोडा ऑक्सिजन द्यायला लागला तर तो दिलासा ठरत नाही.

किरकोळ दर कपात करून इंधन दरवाढीने होरपळलेली जनता अजून पूर्ण बरी झालेली नाही असे सांगून राऊत म्हणाले, केंद्र सरकारने मनात आणले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 50 आणि 60 रुपयांपर्यंत स्थिर राहू शकतात. फार लूट करायची नाही. लोकांचे पाकीट कापून फार पाकीटमारी करायची नाही असे मोदींनी ठरवले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 50, 55 आणि 60 रुपयांपर्यंत स्थिर राहतील. लोकसभा आणि राज्यसभा शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल राऊत यांचा गोवा शिवसेनेतर्फे छोटेखानी सत्कार करण्यात आला.

दरकपातीचे स्वागतच
अडीच रुपये दरकपात करून सुरुवात तर सरकारने केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. अशीच इच्छाशक्ती दाखवत आणखी 15 ते 20 रुपये भविष्यात कमी होतील अशी आशा आपण बाळगत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

summary : centre can decrease rates of petrol diesel to 50 says sanjay raut