MGNREGA चे नाव बदलून योजना बंद करण्याचा मोदी सरकारचा डाव, प्रियांका गांधी यांचा आरोप

मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाचे (MGNREGA ) नाव बदलून ‘विकासित भारत जी राम जी’ (व्हीबी जी रामजी) योजनेच्या प्रस्तावावरून काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मनरेगाचे नाव बदलून योजना बंद करण्याचा मोदी सरकारचा डाव, असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, पूर्वी मनरेगा अंतर्गत एकूण निधीपैकी सुमारे ९० टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जात होता, परंतु नवीन विधेयकात तो कमी केला जात आहे. यावरून स्पष्ट होते की, सरकार जबाबदारी घेऊ इच्छित नाही किंवा लोकांच्या हक्कांचे रक्षण करू इच्छित नाही. त्यांनी आरोप केला की, सरकारला प्रत्येक बाबतीत सत्ता केंद्रित करायची आहे आणि ही त्याची मूलभूत विचारसरणी आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, “प्रत्येक योजनेचे नाव बदलण्याची ही सनक मला समजत नाही. यात देशाचा, सरकारचा खूप खर्च होतो. मनरेगाने गरिबातील गरिबांना एक हक्क दिला. कोणता हक्क? तर, १०० दिवसांचा रोजगार. हे विधेयक त्या अधिकाराला कमकुवत करेल.”