
भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने व्हॉट्सअॅप युजर्ससाठी अॅलर्ट जारी केला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅपच्या डिव्हाइस लिंकिंग फीचरचा गैरवापर करून अकाऊंट हॅक करत आहेत. त्यामुळे युजर्सना खबरदारी घेण्यास सांगिण्यात आले आहे. या हायजॅक पद्धतीला ‘घोस्ट पेअरिंग’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यात हॅकर्स पासवर्ड किंवा सिम स्वॅपची गरज नसताना संपूर्ण अकाऊंट नियंत्रित करतात. ते रिअल टाइम मेसेज वाचू शकतात, फोटो-व्हिडीओ पाहू शकतात आणि तुमच्या कॉन्टॅक्टस्ना मेसेजदेखील पाठवू शकतात.
‘सीईआरटी- इन’च्या सल्ल्यानुसार, हा एक प्रकारचा गंभीर हल्ला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅपच्या ‘लिंक डिव्हाइस वाया फोन नंबर’ या फीचरचा फायदा घेतात.
हॅकर्सना फायदा काय?
एकदा डिव्हाइस लिंक झाल्यावर हॅकर्सना जुने मेसेज वाचण्याची सुविधा, नवीन मेसेज रिअल टाइममध्ये येणे, फोटो-व्हिडीओ आणि व्हॉइस नोट्स पाहणे व तुमच्या कॉन्टॅक्ट्स, ग्रुप्समध्ये मेसेज पाठवण्याची शक्ती मिळते. युझरला याची माहितीही नसते. कारण हे बॅकग्राऊंडमध्ये घडते. सायबर एजन्सीने सांगितले की, अशा प्रकारे नकळतपणे हॅकर्सना पूर्ण अॅक्सेस दिला जातो. ही मोहीम सर्वात आधी चेकियामध्ये दिसली, पण हॅक झालेल्या अकाऊंट्समुळे ती जगभरात पसरू शकते. व्हॉट्सअॅपने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
घोस्ट पेअरिंगपासून कसे वाचाल…
- अॅपवर ओळखीच्या नंबरवरून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
- व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक असल्याचा दावा करणाऱया बाह्य साइट्सवर फोन नंबर टाकू नका.
- अॅपमधील लिंक डिव्हाइस सेक्शन तपासत राहा आणि अज्ञात डिव्हाइस लॉगआऊट करा.
- व्हॉट्सअॅप अकाऊंटमध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवा, यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळेल.

























































