बीबीए, बीसीए, बीएमएस प्रवेशासाठी पुन्हा सीईटी

बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुन्हा सीईटी परीक्षा होणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 29 मे रोजी सीईटी परीक्षा पार पडली होती. मात्र बहुसंख्य उमेदवारांना या परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीने पुन्हा अतिक्क्ति सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 48 हजार 135 विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात 1 लाख 8 हजार 741 एवढय़ा जागा असताना केवळ 40 टक्के जागा भरल्या जातील एवढेच उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित 60 टक्के जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांनी सीईटी सेलला प्रत्यक्ष भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून तसेच ईमेल आणि दूरध्वनीद्वारे अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी केल्याचा दावा सीईटी सेलने केला आहे. त्यानंतर विद्यार्थीहित लक्षात घेता राज्य सरकारनेही अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा होणार आहे. परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या वेबसाईटला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.