
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने आता विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. सीईटी सेलने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षांच्या निकालाकडे सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सीईटी सेलने घेतलेल्या 16 सीईटी परीक्षांना सुमारे 6 लाख 48 हजार 218 विद्यार्थी बसले होते. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल येत्या 29 नोव्हेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर इतर सीईटी परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार, प्रवेश कधी सुरु होणार हे प्रश्न या विद्यार्थ्यांना पडले आहेत. यंदा कोरोनामुळे सर्वच सीईटी परिक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यात कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर या परीक्षा घेण्यात आल्या. सीईटी परीक्षांच्या निकालानंतर प्रवेशाला सुरूवात होणार आहे. यामध्ये डिसेंबर महिना जाईल. त्यानंतर प्रवेश कधी पूर्ण होतील व शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.
एमबीए प्रवेशही रखडले
लॉकडाऊन लागू होण्याआधी 14 आणि 15 मार्चला एमबीए प्रवेशाची सीईटी परीक्षा पार पडली. एप्रिलमध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
– उच्च शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या आठ परीक्षांना 1 लाख 74 हजार 457 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 30 हजार 899 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत.
– तंत्र शिक्षण विभागाद्वारे झालेल्या 5 सीईटीसाठी 1 लाख 48 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 27 हजार 537 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
– फाईन आर्ट पदवी अभ्यासक्रमांसाठी 3 हजार 634 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 423 विद्यार्थ्यांनी ही सीईटी दिली आहे.
– एमएचटी सीईटीला 5 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 3 लाख 86 हजार 791 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.



























































