पारनेरमधील कोरठणमध्ये चंपाषष्ठी उत्साहात साजरी

प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी चंपाषष्ठीची पर्वणी साधून खंडोबाचे दर्शन घेतले. पहाटे 4 वाजता श्री क्षेत्र गाणगापूरहून गणेश शिंदे यांनी आणलेल्या पवित्र गंगाजलाने श्री खंडोबा स्वयंभू मुर्ती व बारा लिंगे यांना मंगलस्नान पुजा करण्यात आली. त्यानंतर चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्ती सिंहासनावर ठेवत साजशृंगार करण्यात आला. ज्ञानदेव घुले, सुरेखा घुले, महादेव पुंडे व भामाबाई पुंडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

सकाळी 6 वाजता डॉ .राजेंद्र आव्हाड व डॉ. दिपाली आव्हाड यांच्या हस्ते खंडोबाचा महाअभिषेक पुजा व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले. यावेळी संगीत आनंद यात्री भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी 10 वाजता गोरगावच्या पायी दिंडीचे देवस्थानकडून स्वागत करण्यात आले. सकाळी 11 वाजल्यापासून भाविकांना महाप्रसाद वाटप सुरू झाले. दुपारी 1 वाजता चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य मंदिर प्रदक्षिणा व कोरठण गड प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भाविक भंडारा खोबरे यांची पालखीवर उधळण करीत होते. पालखी मिरवणूकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. दुपारी अरूणगिरीजी महाराज यांचे हरिकिर्तन, जगद्गुरु शंकराचार्य महाराज करवीर पीठ कोल्हापूर यांचा सत्संग प्रवचन दर्शन तसेच गगनगड कोल्हापूर येथील सेवाभावी बाळगिरी महाराजांचे संत गगनगिरी महाराज महात्म प्रवचनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी लोकेशानंदगिरी महाराज उपस्थित होते.

मिरवणुकीनंतर खंडोबा पालखीचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्टी उत्सवाची महाआरती झाली. महाआरतीनंतर देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. दुपारी 3 वाजल्यापासून श्री खंडोबा गाणी स्पर्धा झाल्या. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंगची सुविधा देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या