
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. याप्रसंगी ANI शी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “भाजप मतांच्या राजकारणासाठी समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
चंद्र कुमार बोस यांनी भाजपच्या धोरणांची तुलना ब्रिटीश राजवटीशी केली. ते म्हणाले, “भाजपचे धोरण ब्रिटिशांप्रमाणेच फोडा आणि राज्य करा असे आहे. ते राजकारणात धर्माला महत्त्व देत आहेत, ज्याला माझे आजोबा शरतचंद्र बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीव्र विरोध होता. भाजपची ही विचारसरणी संविधानाच्या विरोधात आहे.”
सप्टेंबर २०२३ मध्ये वैचारिक मतभेदांमुळे भाजपचा राजीनामा दिलेल्या बोस यांनी तृणमूल काँग्रेसची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट केले. “भाजपची विचारसरणी मला मान्य नव्हती, म्हणून मी पक्ष सोडला. तृणमूल काँग्रेसची सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा मला अधिक जवळची वाटली, म्हणून मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “देशाला एकत्र ठेवण्यासाठी तृणमूलची जबाबदारी मोठी आहे. मी काही ज्योतिषी नाही, पण ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित आहे. सर्व समविचारी पक्षांनी हिंदुस्थानी ही संकल्पना राबवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.


























































