
‘वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा आता जुना झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपचे बावनकुळे यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. 107 हुतात्मे झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला; वेगळा विदर्भ करणे सोपं नाही. शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे कदापि होऊ देणार नाही,’ असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आज सोलापुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत दुपारी शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी आगामी सोलापूर महापालिका निवडणुका एकत्रित लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत खैरे बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘भाजपच्या विरोधात जे-जे पक्ष आमच्याबरोबर येतील, त्यांना सोबत घेऊन आगामी सोलापूर महापालिकेची निवडणूक एकत्र लढून महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर बसवणार आहोत. यासाठी प्रत्येक पक्षाने आपली ताकद पणाला लावून एकत्रपणे लढणे गरजेचे आहे. सोलापुरातील स्थानिक प्रश्न, तसेच राज्यातील आणि देशातील भाजपविरोधातील मुद्दे आगामी महापालिका निवडणुकीत प्रकर्षाने मांडले जातील. आगामी महापालिका निवडणुकीत जुन्या-नव्या शिवसैनिकांची सांगड घालून पक्ष-संघटना मजबूत करण्यात येणार आहे.’
‘शिवसेनेच्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱयांची मदतही सोलापूर महापालिका निवडणुकीत घेण्यात येणार आहे. जो प्रयोग आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये केला होता, तोच सोलापूर जिह्यात करणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले. ‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि धनंजय डिकोळे यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे,’ असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
या बैठकीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, महानगरप्रमुख दत्ता माने, लोकसभा संघटक शरणराज केंगनाळकर, आनंद बुकानुरे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, अतुल भवर, शहरप्रमुख नाना मोरे, राजू बिराजदार, राजू कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. अशोक निंबर्गी, संजय हेमगड्डी, मनसेचे विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, माकपचे अनिल वासम, युसूफ शेख, युवतीसेना सहसचिव पूजा खंदारे, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, अमिता जगदाळे, महानगर संघटिका मंगल थोरात, प्रभावती येलगुंडे, रॉकी बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते.



























































