Video – चंद्रपुरात ‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला शाळा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळाने जग-देश व राज्यात शिक्षण क्षेत्र सर्वाधिक प्रभावित केले आहे. गेल्या मार्चपासून बंद असलेल्या शिक्षणामुळे गरीब -वंचित घटकातील विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न चंद्रपुरातील एका नगरसेवकाने केला असून या ‘झीरो कॉन्टॅक्ट मोहल्ला शाळेच्या’ माध्यमातून कोरोना काळात कृतीपर शिक्षण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. समाजाचे या प्रयत्नाला मोठे पाठबळ लाभत आहे.

कोरोना म्हणजे भय आणि दहशतीचे दुसरे नाव. कोरोनाच्या दहशतीचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला. परीक्षा अवेळी व अनियमित झाल्या. त्यापेक्षा नवे शैक्षणिक सत्र केवळ ऑनलाइन सुरू आहे. आताशा स्थिती जरा सुधारली असली तरी पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून फारसे लाभ दिसत नाहीत. अशा स्थितीत स्मार्टफोन परवडत नसलेल्या गरीब- वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर मनपाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी स्वतःच्या प्रभागात ‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला शाळा’ उभारली आहे.

शहरातील वडगाव प्रभागातील हनुमान मंदिराच्या शेजारी असलेल्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात गेले काही महिने पप्पू देशमुख यांनी ही संकल्पना भक्कमपणे अस्तित्वात आणली आहे. स्मार्टफोन -इंटरनेट सुविधासह ही चैन परवडत नसलेल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना न्यायचे कुठे, असा प्रश्‍न त्यांना सतावत होता. हे विद्यार्थी मूळ शैक्षणिक प्रवाहातून वेगळे जाऊ नये, यासाठी त्यांना कोणतातरी उपक्रम देणे गरजेचे होते. आपल्या सहकार्‍यांशी ही बाब बोलून दाखवताना देशमुख यांना अशा पद्धतीने शिक्षण देण्याचा पर्याय गवसला. या शाळेत सध्या किमान 40 तर कमाल 80 विद्यार्थी शिक्षण घेत असून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आपापल्या वर्गाचे अध्यापन करत आहेत. शिक्षक म्हणून स्वतः देशमुख, मनपाचे शिक्षक, राज्य शिक्षण विभागातील शिक्षक व समाजातील नामवंत शिक्षक यांनी प्रत्यक्ष अध्यापनात सहभाग दिला आहे. ‘कोरोनातून प्रशिक्षण व कोरोनात शिक्षण’ असे ब्रीद घेत उभारलेली ही शाळा यशस्वी ठरली असून समाजातील दानशूर व्यक्तींचे या उपक्रमासाठी मोठे पाठबळ लाभत आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना कोरोना बचावासाठी एक किट देण्यात आली असून, सकाळच्या प्रहरात रोज दोन तास हे विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.

कोरोनाचे बाह्य भय कमी झाले असले तरी शाळांमधील विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती पुन्हा एकदा कोरोनाला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच शारीरिक दुरता पाळून शिक्षणाच्या प्रवाहात सुटलेल्या विद्यार्थ्यांची अशी मोहल्ला शाळा विद्यार्थी वर्गात लोकप्रिय ठरली आहे. अगदी घराच्या जवळ कोरोना नियमांचे पालन करून वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान प्राप्त करणे या चिमुकल्यांसाठी पर्वणी ठरले आहे. स्मार्टफोन नसलेल्या गरीब घटकातील विद्यार्थ्यांसाठी तर हा प्रयत्न उपकारक ठरला आहे.

कोरोना काळात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक इयत्तामध्ये असलेल्या गरीब घटकातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मूळ शिक्षण प्रवाहात हा घटक सुटून जाऊ नये, म्हणून अशा पद्धतीच्या अनेक मोहल्ला शाळांची समाजाला गरज आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम लक्षवेधी म्हटला पाहिजे.