चंद्रपूर मनपातील ‘लेट लतीफांना’ आयुक्तांचा दणका , अधिकारी- कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवले ताटकळत

चंद्रपूर महानगरपालिकेत आयएएस अधिकारी नरेश आकनुरी आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर आज सकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सकाळी दहा वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त नरेश अकनुरी महानगरपालिकेत दाखल झाले. मात्र बहुतांश अधिकारी – कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले.

काही वेळाने अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचे आढळून आले. या कृतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. आयुक्त नरेश अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वेळाने लेट लतीफांचा क्लास घेतल्यावर सर्वांच्या नोंदी घेत त्याना रुजू करून घेण्यात आले.