
निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी समाजाने एकजुटीचे दर्शन घडवत चंद्रपूर जवळील नंदगूर येथील एका प्राचीन महादेव मंदिराचा कायापालट केला आहे. दुर्लक्षित आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करून आदिवासी बांधवांनी आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेची नवी मेढ रोवली आहे.
चंद्रपूरपासून २० किलोमीटर अंतरावर, अंधारी नदीच्या तीरावर आणि घनदाट वनराईत हे प्राचीन महादेव मंदिर वसलेले आहे. हे मंदिर परिसरातील हजारो आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचे केंद्र आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते दुर्लक्षित होते. सामाजिक कार्यकर्ते मधु मेश्राम यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. वन विभागाच्या सहकार्याने या मंदिराच्या कायापालटाचे नियोजन करण्यात आले आणि आज या ठिकाणी महादेवाची देखणी मूर्ती व शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल
या सोहळ्यानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण तेलंगणातील पद्मश्री पुरस्कार विजेते ‘घुसाडी’ नृत्यपथक ठरले. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या विधीसाठी समाजातील जाणकार आणि अभ्यासू व्यक्तींनी पौरोहित्य केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.
तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी
जीर्णोद्धारामुळे हे मंदिर आता एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून आकारास आले आहे. आदिवासी समाजाने एकत्र येऊन सुरू केलेला हा धार्मिक उत्सव आता दरवर्षी साजरा केला जाणार आहे. शासनाने या पवित्र ठिकाणाला ‘तीर्थस्थळ’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी आता समाजाकडून केली जात आहे.
tribal community restores ancient mahadev temple in chandrapur
tribal community near chandrapur restores a 35-year-old mahadev temple in nandgur, showcasing traditional culture and demanding pilgrimage status from the govt.




























































