
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील सुंदरनगर परिसरात शेतामध्ये मतदार ओळखपत्र आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या परिसरातील काही मुले शेतात खेळत असताना त्यांना हे मतदानपत्र आढळून आले. आढळून आलेले मतदारपत्र हे मुदतबाह्य की बनावट, याचा तपास करावा लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष भूषण रामटेके या प्रकरणी आज तहसीलदारांकडे तक्रार नोंदवणार आहेत. अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेवारस अवस्थेत सापडलेल्या या मतदार ओळखपत्रांमुळे शहरात शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.


























































