
चंद्रपूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी अनंत बोबडे हे सध्या वादात सापडले आहेत. जलतरण तलावाच्या कंत्राटासोबतच देखभाल दुरुस्तीच्या खर्चात आर्थिक अनियमितता केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जलतरण तलावाचे कंत्राट देत असताना देखभाल दुरुस्तीचा सर्व खर्च संबंधित कंत्राटदारांना करणे अपेक्षित असते. असं असतानाही या दुरुस्तीसाठी बोबडे यांनी 46 हजार 340 रुपये बिलाचा प्रस्ताव 5 नोव्हेंबर 2019 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूरही झाला होता. या आरोपांमुळे बोबडे यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशानंतर विभागीय संचालक विनायक पुन यांना चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. सध्या वादग्रस्त अधिकारी अनंत बोबडे हे सुट्टीवर आहेत. यामुळे बोबडे यांची चौकशी करण्याऐवजी पुन यांनी कंत्राटदाराची चौकशी केली आणि तलाव तसेच कागदपत्रांची पाहणी करून ते निघून गेले. बोबडे यांची चौकशी करणार अथवा नाही? ते सुट्टीवर असताना चौकशीसाठी अधिकारी कसे आले ? असा प्रश्न बोबडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांनी विचारला आहे.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलामध्ये असलेले जलतरण तलाव कंत्राटदारामार्फत चालविले जातात. हे कंत्राट निविदा पद्धतीने दिलं जातं. गेल्या वर्षी हे कंत्राट काळ्या यादीत टाकलेल्या एका कंत्राटदाराला देण्यात आलं होतं आणि ते बोबडे यांच्या मेहेरबानीमुळे मिळाल्याची दबक्या आवाजात त्यावेळी चर्चा होती. देखभाल दुरुस्तीचा खर्च हा कंत्राटदारानेच करायचा असतानाही यासाठी क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी 46 हजार 340 रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेतला असा त्यांच्यावर आरोप आहे. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याचे बिलही थातूरमातूर पद्धतीने दिल्याचाही आरोप केला गेला आहे.
कंत्राट बहाल केलं जात असताना संबंधित संस्था ही काळ्या यादीत नसल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. ज्या कंत्राटदाराला देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले होते त्या कंत्राटदाराची संस्था मागील अनेक वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले होते. या संस्थेचा जो नोंदणीकृत क्रमांक दाखविण्यात आला तो सुद्धा दुसऱ्या संस्थेचा क्रमांक आहे असा आरोप केला जात होता. या संस्थेचा कारभार बरोबर नव्हता तरीही त्यांना कंत्राट का देण्यात आलं असा प्रश्न विचारला जात होता. यामध्ये नक्की आर्थिक गडबड असावी असा चंद्रपूरातील काही सुजाण नागरिकांना संशय आहे. क्रीडा अधिकारी अनंत बोबडे हेच या सगळ्या प्रकारामागे असल्याचाही त्यांना संशय आहे. क्रीडा अधिकारी बोबडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ‘आम्ही नियमानुसारच कामे केली आहे तुम्हाला जे छापायचे ते छापा’ अशी प्रतिक्रिया दिली होती. जिल्ह्यातील काही पर्यावरण तसेच सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकारातबाबत तक्रारही केली होती.



























































