पाच दिवसांनी इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन ते मिळणार नाही, अशी अफवा पसरल्याने चंद्रपुरात नागरिकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, इंधन मिळवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ बघायला मिळाली.
दुपार पासून इंधन तुटवड्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि चंद्रपूर शहरातील प्रत्येक पेट्रोल पंप गर्दीने ओसंडून वाहू लागल्याचे चित्र निर्माण झाले. शहरातील पंपावर तुफान गर्दी असल्याने वाहनधारकांनी दहा किलोमीटरच्या परिसरात असलेल्या पंपांकडे धाव घेतली. जे वाहनधारक शे दोनशे रुपयांचे पेट्रोल भरायचे, ते आज टाकी पूर्ण भरत असल्याचे बघायला मिळाले. हीच स्थिती चारचाकी वाहनधारकांची होती. एका अफवेमुळे लोकांत किती संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले, याचा प्रत्यक्ष पुरावा आज पंपावर दिसून आला. इंधनाची खरंच कमतरता आहे का ही केवळ अफवा आहे, याचा खुलासा आता प्रशासनाने करण्याची गरज आहे.
























































