चंद्रपुरात दोन अट्टल घरफोड्यांना अटक; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहर परिसरात लागोपाठ तीन मोठ्या घरफोड्या करून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 21 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले असून, यामुळे शहरातील तीन गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

मोहम्मद सरफरोज सगीर (25) आणि सद्दाम मुस्ताक शेख (30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरात चोरीच्या घटना वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. संशयावरून ताब्यात घेतलेल्या या दोघांना कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इंदिरानगर, कृष्णानगर आणि शामनगर भागात या दोघांनी घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.